नवी मुंबई

आता नवी मुंबईतील प्रत्येक विद्यार्थी म्हणणार – “शून्य प्लास्टिकची सुरुवात माझ्यापासून”

प्लास्टिकमुळे पर्यावरणाची आणि मानवी जीवनाची होणारी हानी लक्षात घेता प्लास्टिकच्या वापरावर मोठ्या प्रमाणावर प्रतिबंध आणणे आवश्यक आहे. याकरिता प्लास्टिक प्रतिबंधात्मक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच प्लास्टिकचा वापर कमीत कमी करण्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकताही आणणे तितकेच गरजेचे आहे. यादृष्टीने उमलत्या वयात प्लास्टिकमुळे होणारी हानी मुलांच्या लक्षात आणून देऊन त्यांच्यावर लहानपणापासूनच प्लास्टिक प्रतिबंधाचे संस्कार करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने आणखी एक जनजागृतीपर सकारात्मक पाऊल उचलले आहे.

प्लास्टिक प्रतिबंत्मक उपाययोजनांमध्ये मुलांचा सहभाग करून घेणारा “शून्य प्लास्टिकचा माझ्यापासूनच प्रारंभ” (Zero Plastic Starts With Me) हा अभिनव उपक्रम महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये राबविला जात आहे. हार्ट फाऊंडेशन या शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत सेवाभावी संस्थेच्या सहयोगाने या नावीन्यपूर्ण उपक्रमाला सुरुवात करण्यात आलेली असून या अंतर्गत विद्यार्थ्यांनी चॉकलेटचे रॅपर्स, वेफर्सचे पॅकेट्स, वन टाईम युज प्लास्टिक बॅग्ज अशाप्रकारचा अविघटनशील प्लास्टिक कचरा (Non Degradable Plastic Weast) हा एक लिटर पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक बॉटलमध्ये एकत्र करून त्या बॉटल्स आपल्या शाळेमध्ये जमा करावयाच्या आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा व्यवस्थापनांना या महत्वापूर्ण उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. या आवाहनास अनुसरून शाळांकडून या विशेष उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभत आहे.

प्लास्टिक प्रतिबंधाचा प्रचार आणि प्रसार कऱणा-या या विशेष उपक्रमामध्ये 50 हजाराहून अधिक शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग लाभेल असा विश्वास असून याव्दारे मुलांच्या माध्यमातून त्यांचे कुटुंबीय व शेजारी यांच्यापर्यंतही प्लास्टिक वापराच्या दुष्परिणामांची माहिती पोहचणार आहे. या उपक्रमात इयत्ता 2 री ते 10 वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होणार असून प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला महानगरपालिकेमार्फत आकर्षक प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे.

याशिवाय महापालिका क्षेत्रातील आठही विभागांतील शाळांमधून सर्वाधिक वजनाच्या प्लास्टिक बॉटल्स जमा करणा-या 8 शाळांना विभागीय ‘झिरो प्लास्टिक वेस्ट स्कुल’ पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. या विभागनिहाय आठ पारितोषिकांव्यतिरिक्त संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राकरिता ‘झिरो प्लास्टिक वेस्ट स्कुल’ सर्वोत्कृष्ट शाळेचे वैशिष्ट्यपूर्ण पारितोषिक प्रदान केले जाणार आहे.

त्याचप्रमाणे जास्तीत जास्त वजनाच्या प्लास्टिक बॉट्ल्स जमा करणा-या प्रत्येक विभागातील एका विद्यार्थ्यास ‘झिरो प्लास्टिक वेस्ट चॅम्पियन —- वॉर्ड’ तसेच महापालिका क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणा-या विद्यार्थ्यास ‘झिरो प्लास्टिक वेस्ट नवी मुंबई चॅम्पियन’ या पुरस्काराने गौरविले जाईल.

दिनांक 04 डिसेंबर पर्यंत या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या प्लास्टिक बॉट्ल्स आपल्या शाळेत जमा करावयाच्या असून दि. 05 डिसेंबर रोजी त्या शाळांमधून महानगरपालिकेमार्फत संकलीत केल्या जाणार आहेत. महानगरपालिकेमार्फत या संकलित प्लास्टिक बॉट्ल्सचा उपयोग ‘टाकाऊ पासून टिकाऊ’ या संकल्पनेअंतर्गत नवनिर्मितीसाठी केला जाणार आहे.

या उपक्रमाची अधिक माहिती युट्युबवर https://www.youtube.com/watch?v=G3VI-Npx0lE या लिंकवर उपलब्ध असून यामध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे.

प्लास्टिक हे अत्यंत हानीकारक असून याबाबत विद्यार्थ्यांमध्ये व त्यांच्यामार्फत पालक आणि परिवारामध्ये जनजागृती करणा-या “शून्य प्लास्टिकचा माझ्यापासूनच प्रारंभ” (Zero Plastic Starts With Me) या अभिनव उपक्रमात शाळा व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.         

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button