नवी मुंबई

आता कोव्हीड रिपोर्ट फक्त एका क्लिकवर

कोव्हीड टेस्ट केल्यानंतर टेस्टचा रिपोर्ट सहजपणे उपलब्ध व्हावा याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोव्हीड पोर्टलवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिक एका क्लिकवर आपला कोव्हीड रिपोर्ट पाहू शकतात तसेच त्याची प्रिंटही काढून घेऊ शकतात.

याशिवाय कोव्हीड टेस्ट करताना नागरिकांनी नोंदणी केलेल्या मोबाईलवर एसएमएस संदेशव्दारेही लिंक पाठविली जात असून त्या लिंकवर क्लिक केल्यानंतरही कोव्हीडचा रिपोर्ट उपलब्ध होत आहे.

नागरिकांनी कोव्हीड टेस्ट केल्यानंतर टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास संबंधित व्यक्तीला लगेच कळविण्यात येते व विलगीकरणाची तसेच रूग्णाच्या संपर्कातील व्यक्तीशोधाची पुढील प्रक्रिया सुरू होते. मात्र रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्या व्यक्तीस तितक्या जलद कळविले जात नाही, त्यामुळे ज्या व्यक्तीची टेस्ट केली आहे त्याच्या मनात साशंकता राहते. याबाबत ठोस उपाययोजना करावी अशी मागणी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्याकडे केली जात होती. त्यानुसार नागरिकांना सहजपणे रिपोर्ट उपलब्ध होतील अशी कार्यवाही करण्याचे आयुक्तांमार्फत निर्देश देण्यात आले होते.

या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmccovidcare.com या संकेतस्थळावर विशेष सुविधा निर्माण करण्यात आली असून या वेबसाईटवर covid 19 test report सेक्शनमध्ये ज्या व्यक्तीची कोव्हीड टेस्ट केलेली आहे, त्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक टाकल्यास त्याच्या मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक अपलोड करून लगेच कोव्हीड टेस्टींग रिपोर्ट प्राप्त होत आहे. या रिपोर्टची प्रिंट काढून घेणेही सहजशक्य आहे.

याशिवाय कोव्हीड टेस्ट करताना नागरिकांनी नोंदणी केलेल्या मोबाईलवर एसएमएस संदेश प्राप्त होत असून त्या टेस्टचा कोव्हीड रिपोर्ट पोर्टलवर अपलोड झाल्यानंतरही एसएमएस संदेश येत असून त्या एमएसएस मधील लिंकवर क्लिक केल्यानंतरही कोव्हीडचा रिपोर्ट उपलब्ध होत आहे.

महानगरपालिकेची रूग्णालये, नागरी आरोग्य केंद्रे तसेच एपीएमसी मार्केट, रेल्वे स्टेशन्स येथील कोव्हीड टेस्टींग सेंटरमध्ये अँटिजेन अथवा आरटी-पीसीआर टेस्ट केलेल्या कोणत्याही व्यक्तीचा रिपोर्ट या माध्यमातून एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. तरी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button