नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एका राष्ट्रीय विक्रमाची नोंद
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
“इंडियन स्वच्छता लीग” अंतर्गत 7.5 कि.मी. तिरंगा झळकावित स्वच्छता संदेश प्रसारक मानवी साखळीची ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ ने केली राष्ट्रीय विक्रमात नोंद
भारतीय स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष आनंदाने साजरे करताना पामबीच मार्गावर महापालिका मुख्यालयापासून मोराज सर्कल सानपाडा पर्यंत 7500 मीटरचा अर्थात 7.5 कि.मी.ची मानवी साखळी करून तिरंगा झळकवत 8 हजारहून अधिक नवी मुंबईकर नागरिकांनी देशभक्तीसह स्वच्छतेचा संदेश प्रसारित केला. या अभिनव उपक्रमाची दखल ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ या विविध क्षेत्रातील विक्रम नोंदविणा-या मान्यताप्राप्त संस्थेमार्फत घेण्यात आली असून नवी मुंबई महानगरपालिकेस या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबाबत राष्ट्रीय विक्रम प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलेले आहे. ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ चे परीक्षक श्री. बी.बी. नायक यांनी हे प्रमाणपत्र व मेडल राजीव गांधी स्टेडीयममधील विशेष कार्यक्रमात महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्याकडे प्रदान केले.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या स्वच्छ अमृत महोत्सव कालावधीत “इंडियन स्वच्छता लीग” अंतर्गत लोकसहभागातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामधील एक आगळावेगळा उपक्रम आज नवी मुंबईचा क्विन्स नेकलेस म्हणून ओळखल्या जाणा-या पामबीच मार्गावर आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महिला बचत गट, महिला संस्था, महिला मंडळे, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध स्वयंसेवी संस्था यांचे प्रतिनिधी, पोलीस ॲकॅडमीचे प्रशिक्षणार्थी आणि लोकप्रतिनिधी अत्यंत उत्साहाने सहभागी झाले होते. पाऊस असूनही तिरंग्याचा यथोचित सन्मान राखला जाईल याची संपूर्ण काळजी घेत या मानवी साखळीमध्ये सहभागी 8 हजारहून अधिक नागरिकांनी देशप्रेमाचे अनोखे दर्शन घडविले. नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यामध्ये विशेषत्वाने महिला कर्मचा-यांनीही उत्साही उपस्थिती दर्शवित मानवी साखळीच्या यशस्वितेमध्ये सक्रीय सहभाग घेतला.
मानवी साखळीच्या आयोजनानंतर विविध स्वयंसेवी संस्थांच्या पर्यावरणप्रेमी प्रतिनिधींनी पामबीच मार्गालगतच्या कांदळवनात सफाई मोहिम राबवून पर्यावरणशीलतेचे दर्शन घडविले. स्वच्छता संदेश प्रसारणासह मानवी साखळीच्या अभिनव उपक्रमाची नोंद राष्ट्रीय विक्रम स्वरुपात नोंदविली गेल्याने नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.