नवीन 22 लसीकरण केंद्र 16 जूनपासून सुरू
कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोव्हीड 19 लसीकरणाला अधिक गती मिळावी व नवी मुंबईतील कोणताही नागरिक लसीकरणापासून वंचीत राहू नये याकरिता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार नवीन 22 लसीकरण केंद्र 16 जूनपासून सुरू करण्यात येत आहेत. याठिकाणी विनामूल्य लसीकरण होणार आहे.
सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 34 लसीकरण केंद्रे कार्यान्वित असून नागरिकांना त्यांच्या घरापासून जवळ सहजपणे लस घेता यावी याकरिता आणखी 22 नवीन लसीकरण केंद्रे सुरु करण्यात येत आहेत. यामध्ये आवश्यकतेनुसार आणखी वाढ करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. कोव्हीड लस घेतलेल्या कोणत्याही व्यक्तीस आजतागायत मोठ्या प्रमाणात त्रास झालेला नसून ही लस पूर्णत: सुरक्षित आहे याची नोंद घेऊन नागरिकांनी अवश्य कोव्हीड लस घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.