नवी मुंबई

नवी मुंबई टास्क फोर्सशी कोव्हीड उपचार पध्दतीच्या नियोजनाबाबत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचा बेवसंवाद

कोव्हीड विषाणूचा प्रादुर्भाव, त्याच्या लक्षणांमधील होणारे बदल तसेच त्यानुसार अंगिकारावयाची उपचारपध्दती याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांमध्ये त्यांच्या प्रदीर्घ अनुभवानुसार विचारांचे आदानप्रदान व्हावे व यामधून कोरोनाविषयक उपचारांना योग्य दिशा मिळावी यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने कोव्हीड टास्क फोर्स स्थापित केला आला आहे. या टास्क फोर्सची विशेष बैठक आयोजित करीत आज महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी तज्ज्ञ डॉक्टरांशी वेबसंवादाव्दारे कोव्हीड विषयक विविध मुद्द्यांविषयी विस्तृत चर्चा केली.

यामध्ये, महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे समवेत नायर हॉस्पिटलचे मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. गिरीश राजाध्यक्ष, किंग एडवर्ड मेमोरिअल हॉस्पिटलचे कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. गजानन वेल्हाळ, कार्डिओलॉ़जिस्ट डॉ. उदय जाधव, बालरोगतज्ज्ञ डॉ. उपेंद्र किजवडेकर, इन्टेसिव्हिस्ट डॉ. अक्षय छल्लानी, ॲनेस्थेटिस्ट डॉ. जेसी एलिझाबेथ, फिजीशिअन डॉ. अजय कुकरेजा आदी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच महापालिका अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ़. धनवंती घाडगे सहभागी झाले होते.

सध्या दुस-या लाटेत कोव्हीडमुळे मृत्यूमुखी पडणा-या व्यक्तींचा अभ्यास केला असता 50 वर्षावरील रूग्णांची संख्या 80 टक्केपेक्षा जास्त दिसत असून रूग्णाची ऑक्सिजन पातळी झपाट्याने खालवत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर 50 वर्षांवरील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीस गृह विलगीकरणात (Home Isolation) न ठेवता त्यांस कोव्हीड सेंटर अथवा रूग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. याबाबत तज्ज्ञांसोबत चर्चा करताना जे रूग्ण गृह विलगीकरणात आहेत त्या रूग्णांच्या बाबत असे कोणते ट्रिगर असावेत ज्यावेळी त्यांनी रूग्णालयात दाखल होणे अनिवार्य आहे याविषयी तसेच या अनुषंगाने खाजगी डॉक्टर्स आणि सिनियर फिजीशिअन यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

त्याचप्रमाणे – रेमडेसिविर इंजेक्शनचा सुयोग्य वापर, कोव्हीड प्रतिबंधात स्टिरॉईडची उपयुक्तता, सध्याची ऑक्सिजन कमतरता पाहता HFNC (High Flow Nesal Canula) चा वापर प्रतिबंधित करणे, प्लाझमा बाबतचा अनुभव अशा विविध मुद्द्यांवरही विचारविनीमय करण्यात आला.

रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापराबाबत सर्व रूग्णालयांनी राज्य कृती दल (State Task Force) यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसारच रेमडेसिविरचा वापर करणे अनिवार्य असल्याचे व कोणत्याही रूग्णालयाने रेमडेसिविरची औषध चिठ्ठी (Prescription) रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना देणे कायद्याने प्रतिबंधित असल्याबाबत सर्वांचे एकमत झाले.

त्याचप्रमाणे कोव्हीड रूग्णांच्या बाबत प्लाझमा उपचारपध्दतीचा फार जास्त वापर नसल्याचे संपूर्ण जगभरात निदर्शनास आल्याने कोव्हडच्या ट्रिटमेंट प्रोटोकॉलमध्ये प्लाझमाचा समावेश करण्यात येऊ नये तसेच कोणत्याही डॉक्टरांनी प्लाझमा उपचार पध्दतीची शिफारस करू नये असे मत सर्व अनुभवी तज्ज्ञांनी व्यक्त केले.

कोव्हीडच्या तिस-या लाटेची तयारी करण्यासाठी कोव्हीड लसीकरणाचे प्रमाण अधिक वाढविण्याची आवश्यकता सर्व सदस्यांनी नमूद केली. तसेच तिस-या लाटेसाठी सज्जता करताना आयसीयू बेड्स व व्हेटिलेटर्सची अधिकाधिक उपलब्धता व्हावी यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याबाबत सर्वांचे एकमत झाले.

सध्या दुस-या लाटेचा सामना करीत असताना कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देत असताना संभाव्य तिस-या लाटेविषयी आधीपासूनच सतर्कता बाळगत नवी मुंबई महानगरपालिका आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या नियोजनाला लागलेली असून आजचा आयुक्तांचा वेबसंवादही त्याच दृष्टीने महत्वाचा होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button