नवी मुंबईत रूग्णदुपटीचा कालावधी (Doubling Rate) 3196 दिवसांवर; दैनंदिन कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी झाले असले तरी काळजी घेणे गरजेचे
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांचे प्रमाण सध्या कमी झाल्याचे निदर्शनास येत असून रूग्णदुपटीचा कालावधी (Doubling Rate) 3196 दिवसांइतका झालेला आहे. तथापि कोरोना अजून पूर्ण संपलेला नाही आणि तिस-या लाटेचा धोका अजून टळलेला नाही हे लक्षात घेत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे निर्देशानुसार अगदी दिवाळीच्या 4 दिवसातही दररोज सरासरी साडेचार हजार इतके टेस्टींगचे प्रमाण ठेवलेले होते. दिवाळीनंतर आता पुन्हा दैनंदिन साडेसात हजारापर्यंत टेस्टींग सुरू करण्यात आलेले आहे.
रेल्वे स्टेशन, राज्यातील विविध ठिकाणाहून येणा-या व्यापारी, कामगारांची वर्दळ असणारे एपीएमसी मार्केट अशा कोव्हीड प्रसारासाठी जोखमीच्या ठिकाणी विशेष टेस्टींग बूथ कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे ज्या सोसायटी, वसाहती याठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळतो तेथील प्रत्येक व्यक्तीचे टेस्टींग करून टारगेटेड टेस्टींगवर भर दिला जात आहे. तसेच कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधाचे प्रमाणही 31 इतके राखले जात आहे आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना कोव्हीड लसीकरणात अडचण होऊ नयेत यादृष्टीने दिवाळीच्या काळातही 4 रूग्णालयांमध्ये लसीकरण करण्यात आले.
सध्या ॲक्टिव्ह रूग्णसंख्येतही घट झाल्याचे दिसून येत असून दुस-या लाटेच्या अत्युच्च काळात 11 एप्रिल 2021 रोजी 11605 इतकी असलेली ॲक्टिव्ह रूग्णसंख्या आता 8 नोव्हेंबर 2021 रोजी 308 इतकी घटलेली दिसत आहे. दिवाळीत 5 नोव्हेंबर 2021 रोजीची 16 ही दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या सर्वात कमी होती. सध्या कोरोनाची रूग्णसंख्या घटताना दिसत असली तरी पहिल्या व दुस-या लाटेतील रूग्णसंख्या कमी होत ठराविक कालावधीनंतर झपाट्याने वाढण्याचा यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता तसेच चीन, युके, रशिया व इतर देशांतील तिस-या – चौथ्या लाटेत रूग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारे अतिआत्मविश्वास न दाखविता काळजी घेत कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने मास्कचा वापर करावाच शिवाय इतरांनाही त्यांच्या व आपल्या आरोग्य सुरक्षेसाठी मास्क वापरण्याचे आवाहन करावे त्याचप्रमाणे कोव्हीड लसीचा दुसरा डोस विहित वेळ झाल्यानंतर त्वरित घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.