नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पल्स पोलिओ लसीकरणासाठी 728 बूथचे नियोजन
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात रविवार दि.18 सप्टेंबर 2022 रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये 0 ते 5 वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ लसीकरण करण्यात येणार असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने पोलिओ लसीकरणाचे सुयोग्य नियोजन केले आहे.
भारत देश पोलिओमुक्त आहे. परंतू काही देशांमध्ये अद्याप पोलिओ असल्याने तो पुन्हा परत येऊ शकतो यासाठी राष्ट्रीय स्तरावर पल्स पोलिओ मोहीम राबविली जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 0 ते 5 वर्ष वयोगटामधल्या अपेक्षित 90865 बालकांच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेऊन मोहीमेचे नियोजन करण्यात आले आहे. त्याकरिता 23 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात 603 स्थायी, 97 ट्रांझिट व 28 मोबाईल असे एकूण 728 बूथ कार्यरत असणार आहेत. या लसीकरण मोहिमेसाठी मॉल, रेल्वे स्टेशन, बस स्टँड अशा वर्दळीच्या ठिकाणी ट्रांझिट व फिरती मोबाईल पथके तयार करण्यात आलेली आहेत.
त्याचप्रमाणे महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षेतखाली सिटी टास्फ फोर्स समितीची बैठक घेण्यात आली असून वैदयकीय अधिकारी, एनएम, एलएचव्ही, एएनएम, आशा व स्वयंसेवक यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. या मोहीमेकरीता महापालिका कार्यक्षेत्रात जनजागृतीपर पोस्टर्स व बॅनर्स लावण्यात आले आहेत. पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेच्या दिवशी बूथवरील स्वयंसेवकांनी व पुढील 5 दिवसापर्यंत स्वयंसेविकांनी मास्क वापरणे, बाळाला लस देण्यापूर्वी हाथ सॅनिटाईज करणे व बाळाला हाताचा स्पर्श होणार नाही याची काळजी घेणे. तसेच डाव्या कंरगळीवर पेनने खूण करताना बाळाचा हात न पकडणे याबाबात प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. लसीकरणाच्या वेळी बूथवर सामाजिक अंतर ठेवण्यासाठी खडूने दोन फूट अंतर राखून वर्तुळ करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. कोविड सुरक्षा नियमाचे पालन करुन योग्य पध्दतीने लसीकरण करण्याचे निर्देश सर्वांना देण्यात आले आहेत.
या पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत ज्या बालकांना 18 सप्टेंबर 2022 रोजी डोस दिला गेला नाही त्यांना महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने 875 टिमव्दारे गृहभेटीमध्ये पुढील 5 दिवस लसीकरण करण्यात येणार आहे. याकरिता प्रत्येक टिमचे कार्यक्षेत्रनिहाय सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
तरी पालकांनी आपल्या बालकाच्या संपूर्ण सुरक्षिततेची खात्री करुन घ्यावी. पोलिओचा डोस प्रत्येक वेळी द्यावा. पोलिओवर मात करण्यासाठी देशव्यापी मोहिमेत सहभागी व्हावे आणि आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला पल्स पोलिओ लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.