नवी मुंबई

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांकरिता 6 शिष्यवृत्ती योजना:

विविध समाज घटकांच्या सक्षमीकरणासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाजविकास विभागामार्फत विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणा-या 6 योजनांकरिता 31 ऑगस्ट 2021 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

या योजनांमध्ये –
(1) विधवा / घटस्फोटित महिलांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
(2) आर्थिक व दुर्बल घटकातील शाळेत जाणाऱ्या इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन पर्यंतच्या विद्यार्थांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
(3) इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन पर्यंतच्या शिक्षणासाठी गुणवत्ताप्राप्त मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
(4) नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
(5) नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नमुंमपा आस्थापनेवरील सफाई कामगार व कंत्राटी पध्दतीवर असलेल्या कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
(6) नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दगडखाण / बांधकाम / रेती / नाका कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.

– अशा 6 योजनांचा समावेश आहे.

या शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज करणे विद्यार्थी व पालकांना सुलभ व्हावे याकरिता सहजसोपी प्रक्रिया राबविण्यात येत असून ज्या विद्यार्थ्यांनी सन 2019-20 या वर्षातील शिष्यवृ्त्ती योजनेचा लाभ घेतला असेल त्यांनी अर्जासोबत केवळ नव्याने देणे आवश्यक आहे अशी गुणपत्रिका, शाळेचे शिफारसपत्र, उत्पन्न दाखला, शहारातील 3 वर्षांचे वास्तव्य ठिकाण बदलले असल्यास सध्याच्या रहिवासाचा पुरावा, कंत्राटदार / विभागप्रमुखाचे प्रमाणपत्र अशा प्रकारची कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. इतर कागदपत्रांची शहनिशा यापूर्वीच्या उपलब्ध अभिलेखातून करण्यात येईल.

तथापि काही कारणामुळे सन 2019-20 मधील शिष्यवृत्तीधारकांचे अर्ज अभिलेख्यामध्ये उपलब्ध होऊ शकले नाहीत त्यांना समाजविकास विभागाच्या उपायुक्त यांचे मान्यतेने आवश्यक कागदपत्रे सात दिवसात कार्यालयात जमा करण्याबाबत दूरध्वनीव्दारे कळविण्यात येईल. सदर 7 दिवसांच्या मुदतीत संबंधितांनी कागदपत्रे सादर न केल्यास सन 2020-21 करिता सादर केलेला अर्ज अपात्र होईल.

तसेच सन 2019-20 च्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेल्या ज्या अर्जदारांना पुन्हा स्वेच्छेने अर्ज करावयाचा आहे त्यांना तो नव्याने सादर करता येईल.

तथापि ज्यांनी सन 2019-20 च्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेला नाही अशा सन 2020-21 करिता नव्याने अर्ज करणा-या विद्यार्थ्यांनी अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.

विविध घटकांतर्गत राबविण्यात येत असलेल्या या शिष्यवृत्ती योजनांकरिता विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह दि. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत सर्व विभाग कार्यालये, नमुंमपा संचलित सर्व ग्रंथालये, समाजविकास विभाग कार्यालय, बेलापूर भवन, 1 ला मजला, से. 11, सी.बी.डी., बेलापूर आणि नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भूखंड क्र..1, किल्ले गांवठाण जवळ, पामबीच जंक्शन, सेक्टऱ 15 ए, सी.बी.डी., बेलापूर, नवी मुंबई – 400614 या ठिकाणी शासकीय व सार्वजनिक सुट्टया वगळून कार्यालयीन वेळेत जमा करावयाचे आहेत.

अंतिम दिनांक 31 ऑगस्ट 2021 रोजी, सायं. 6.15 नंतर आलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावयाची आहे. तरी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणा-या शिष्यवृत्ती योजनांचा महानगरपालिका क्षेत्रातील पात्र विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्यावतीने करण्यात येत आहे.

जाहिरात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button