नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 1.5 लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण
महापालिका क्षेत्रात झालेल्या लसीकरणाचा तपशील –
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 1.5 लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण, 45 वर्षावरील 1 लाखाहून अधिक नागरिकांनी घेतली लस
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेची 28 रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्रे तसेच 21 खाजगी रुग्णालये अशा 49 लसीकरण केंद्रांवर कोव्हीड 19 लसीकरण होत असून 14 एप्रिलपर्यंत 1 लाख 58 हजार 270 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यातील विशेष बाब म्हणजे 45 वर्षावरील 1 लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
दररोज साधारणत: 7 हजाराहून अधिक नागरिकांचे लसीकरण होत असून आत्तापर्यंत 1 लक्ष 58 हजार 270 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेची वाशी, नेरूळ, ऐरोली या तीन रुग्णालयांत दिवसरात्र 24 x 7 लसीकरण करण्यात येत असून तुर्भे येथील रामतनु माता बाल रूग्णालय आणि सर्व 23 नागरी आरोग्य केंद्रे याठिकाणी सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत लसीकरण केले जात आहे. याशिवाय वाशी सेक्टर 5 येथील ईएसआयएस रूग्णालयामधील जम्बो लसीकरण केंद्रात 4 बूथ कार्यान्वित असून त्याठिकाणी सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत 2 सत्रात लसीकरण सुरू आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या केंद्रांवर आठवड्याचे सातही दिवस मोफत लसीकरण करण्यात येत आहे. याशिवाय 21 खाजगी रुग्णालयांमध्येही शासनाने निश्चित केलेल्या रु. 250/- प्रति डोस दराने लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेकडे लसींचा पर्याप्त साठा उपलब्ध असून 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी अत्यंत सुरक्षित असलेली कोव्हीड लस आपल्या जवळच्या केंद्रावर जाऊन घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.