नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळा, विद्यालयातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता बारावीच्या वर्गास प्रत्यक्ष सुरूवात
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 20 जानेवारी, 2022 रोजीच्या परिपत्रकान्वये शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा, विद्यालयातील पूर्व प्राथमिक ते इयत्ता बारावीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करणेबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या होत्या. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महानगरपालिका / खाजगी अनुदानित / खाजगी विना अनुदानित / खाजगी कायम विना अनुदानित अशा सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा आज दि. 24 जानेवारी 2022 पासून सुरू झालेल्या आहेत.
नवी मुंबई शहरात महानगरपालिकेच्या प्राथमिक 55 व माध्यमिक 21 तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या एकूण 365 शाळा आहेत. पूर्वप्राथमिक वर्गापासून अनेक महिन्यांनी शाळा प्रत्यक्ष भरल्याने सर्व शाळांमध्ये पहिल्याच दिवशी चांगला उत्साह पाहायला मिळाला. विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांनी मिळून पुन्हा एकदा शाळा प्रवेशोत्सव साजरा केला.
शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी अनेक शाळांमध्ये सजावट करण्यात आली होती. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कोरोनाचे सर्व नियम पाळून सामाजिक अंतर ठेवून विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. शाळा सुरू झाल्यामुळे पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.