नवी मुंबई

नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारी यांची पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना, सफाई कर्मचा-यांच्या वारसाला नोकरी

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्कारांनी नवी मुंबई महानगरपालिका सन्मानित होत असताना यामध्ये महत्वाचे योगदान देणा-या महानगरपालिकेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्या हिताचे अनेक कल्याणकारी निर्णय महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी घेतले आहेत. यामध्ये विशेषत्वाने चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी प्रशासन विभागास निर्देश दिले आहेत.

त्यानुसार महानगरपालिका आस्थापनेवर सफाई कर्मचारी संवर्गात कार्यरत असलेल्या कर्मचा-यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास अथवा त्यांच्या सेवानिवृत्ती / स्वेच्छानिवृत्ती नंतर किंवा कर्मचारी वैद्यकीय दृष्ट्या अपात्र असल्यास त्यांच्या जागेवर त्यांच्या वारसास लाड – पागे समितीच्या शिफारशीनुसार नोकरी देण्याची तरतूद आहे. त्यानुसार 8 सफाई कामगारांच्या वारसांना सफाई कामगार या पदावर नियुक्तीचे आदेश बजावण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. मागील 7 वर्षांपासून प्रलंबित असलेला सफाई कामगारांच्या वारसांचा प्रश्न यामुळे निकाली निघाला असून आम्हाला न्याय मिळाला अशी भावना त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.

अशाच प्रकारे मागील 20 हून अधिक वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत असणारे विविध संवर्गातील चतुर्थश्रेणी कर्मचारी पदोन्नती न झाल्यामुळे लाभापासून वंचित होते. याचा साकल्याने विचार करून आयुक्तांनी सहाय्यक प्लंबर / मदतनीय पदावरून 8 कर्मचा-यांना प्लंबर – फिटर पदावर पदोन्न्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच व्रणोपचारक (ड्रेसर) पदावरून 3 कर्मचा-यांना शस्त्रक्रिया गृहसहाय्यक या पदावर पदोन्नती दिलेली आहे. अशाप्रकारे अनेक वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत असणा-या 11 चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची व्यथा जाणून घेत आयु्क्तांनी त्यांच्या बढतीतील अडचण दूर करत त्यांना पदोन्नती दिली आहे. मागील 4 महिन्यात 22 संवर्गातील 122 अधिकारी, कर्मचारी यांच्या पदोन्नत्या करण्यात आलेल्या आहेत.

त्याचप्रमाणे कर्मचा-यांना आपल्या सेवा कालावधीत पदोन्नतीची संधी न मिळाल्याने येणारी कुंठितता घालविण्यासाठी सातव्या वेतन आयोगाच्या 3 लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी नवी मुंबई महानगरपालिकेत करण्यासाठी आयुक्तांनी त्वरीत मंजूरी दिली. याचा फायदा 60 टक्के महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना होत असून त्यामधील 108 लिपिक / टंकलेखक, 9 रेकॉर्ड असिस्टंट, 2 रक्त संक्रमण अधिकारी अशा एकूण 119 कर्मचा-यांना आज आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आलेली आहे. अशाप्रकारे मागील 4 महिन्यांच्या कालावधीत 150 कर्मचा-यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे.

कोरोना काळात महापालिका अधिकारी, कर्मचारीहिताय विविध निर्णय महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी घेतले आहेत. त्यानंतरही अधिकारी, कर्मचारी यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचे व अनेक वर्षांपासून सातत्याने मागणी होत असूनही प्रलंबित असलेले पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना, लाड-पागे समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी असे महत्वपूर्ण निर्णय आयुक्तांनी प्राधान्याने घेतल्यामुळे व त्यातही चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचा विशेषत्वाने विचार केल्यामुळे अधिकारी, कर्मचारीवृंदात आनंदाचे वातावरण असून यामुळे ते अधिक जोमाने काम करतील असा विश्वास महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button