नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 723 बूथवर 65 हजाराहून अधिक मुलांना पल्स पोलिओ लसीकरण
आरोग्यविषयक विविध मोहिमा राबविण्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच आघाडीवर राहिलेली आहे. त्यास अनुसरून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली, केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रविवारी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली. महापालिका क्षेत्रात 723 बूथवर 65564 मुलांचे पल्स पोलिओ लसीकरण करण्यात आले.
याकरिता 23 नागरी आरोग्य केंद्रांच्या वतीने खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे दवाखाने, सोसायटी कार्यालये, रूग्णालये याठिकाणी 601 स्थायी बूथ तसेच रेल्वे स्टेशन, बस डेपो, मॉल, डि मार्ट अशा 94 ठिकाणी अस्थायी बूथ त्याचप्रमाणे दगडखाणी, उड्डाणपूलाखाली व रेल्वेलगत असलेल्या झोपड्या, बांधकाम ठिकाणे अशा ठिकाणी 28 मोबाईल बूथ अशाप्रकारे विविध जागी एकूण 723 लसीकरण बूथ निर्माण करण्यात आले होते. 5 वर्षाखालील साधारणत: 87 हजार लाभार्थी बालके नजरेसमोर ठेवून या मोहिमेचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते.
सकाळी 8 ते सायं. 5 या वेळेत नवी महानगरपालिका क्षेत्रात 5 वर्षाखालील 65 हजार 564 बालकांनी पल्स पोलीओ लसीकरणाचा लाभ घेतला. ज्या संभाव्य लाभार्थी बालकांचे काही कारणांमुळे लसीकरण झालेले नाही त्यांच्याकरिता इन्टेन्सिफाईड पल्स पोलिओ लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली असून दि. 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत घरोघरी जाऊन पल्स पोलिओ डोस देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. याकरिता 764 पथके निर्माण करण्यात आलेली आहेत.
कोव्हीड प्रभावित काळात ही पल्स पोलिओ लसीकरण मोहीम होत असल्याने व त्यातही 5 वर्षाखालील लहान बालकांना हे लसीकरण केले जात असल्याने सर्व बूथवर कोव्हीड प्रतिबंधात्मक सुरक्षा बाबींचे पालन करण्यात आले होते. तशा प्रकारे काटेकोर कार्यवाही करण्याच्या सूचना बूथवरील कर्मचारी, स्वयंसेवक यांना प्रशिक्षणाच्या वेळी देण्यात आल्या होत्या. त्यास अनुसरून सर्व बुथसमोर सुरक्षित अंतर राखण्यासाठी वर्तुळे आखण्यात आली होती. बुथवर हात धुण्याची तसेच सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली होती. लसीकरण करताना सहभागी स्वयंसेवकांना मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला होता. स्वयंसेवकांसह पालक नागरिकांनीही मास्क परिधान केला असल्याची काळजी घेण्यात आली.
बालकाला लस पाजण्यापूर्वी व पाजल्यानंतर हात सॅनिटाईज करण्यात आले. तसेच लस देताना बालक पालकाकडेच असेल याची काळजी घेऊन बालकाची हनुवटी पालकांनाच पकडायला सांगून बाळाला स्पर्श न करता तसेच ड्रॉपरचा स्पर्श बाळाच्या तोंडाला होणार नाही याची दक्षता घेऊन लांबूनच लस पाजण्यात आली. अगदी लसीकरण झाल्याचे फिंगर मार्कींग करतानाही बाळाला स्वयंसेवकाने स्पर्श न करता बालकाचे बोट पालकांना धरण्यास सांगून फिंगर मार्कींग करण्यात आले. अशा प्रकारची काळजी सर्व पोलिओ बूथवर घेण्यात आली.
नवी मुंबई शहराच्या पोलिओ मुक्तीकरिता पल्स पोलिओ लसीकरण अत्यंत महत्वाचे असून 5 वर्षाखालील ज्या बालकांचे रविवारी पल्स पोलिओ लसीकरण झालेले नसेल अशा बालकांसाठी राबविण्यात येणा-या इन्टेसिफाईड पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेमध्ये आपल्या घरी येणा-या महानगरपालिकेच्या आरोग्य स्वयंसेवकांना आपल्या मुलांविषयी सत्य माहिती देऊन पोलिओ डोस पाजून घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.