नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 1 लक्ष 5 हजाराहून अधिक नागरिकांना कोव्हीड 19 लसीकरण
शासन निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 16 जानेवारीपासून पहिल्या टप्प्यातील आरोग्यकर्मींपासून कोव्हीड 19 लसीकरणास सुरुवात झालेली असून 2 एप्रिल रोजी नवी मुंबईतील 1 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे.
यामध्ये, 24822 आरोग्यकर्मींना, 18559 पहिल्या फळीतील कोरोना योध्यांना, 10277 ज्येष्ठ कोमॉर्बिड नागरिकांना, 43392 ज्येष्ठ नागरिकांना तसेच 1 एप्रिलपासून सुरू झालेल्या 45 वर्षे ते 60 वर्षे या वयोगटाच्या सत्रातील 8847 नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. अशाप्रकारे एकूण 1 लक्ष 5 हजार 897 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे.
तपशील पहिला डोस दुसरा डोस
पहिला टप्पा – डॉक्टर्स 24822 13326
व इतर आरोग्यकर्मी
………………………………………………………………….
दुसरा टप्पा – पोलीस, 18559 6442
सुरक्षा. स्वच्छता व इतर
पहिल्या फळीतील कोरोना योध्दे
…………………………………………………………………
तिसरा टप्पा – 43392 111
ज्येष्ठ नागरिक
………………………………………………………………..
45 वर्षावरील 10277 23
कोमॉर्बीड व्यक्ती
……………………………………………………………….
45 ते 60 वयाचे 8847 –
नागरिक
………………………………………………………………
एकूण 105897 –
लसीकरणासाठी सद्यस्थितीत महानगरपालिका क्षेत्रात 41 लसीकरण केंद्रे व 1 जम्बो लसीकरण केंद्र कार्यान्वित आहे. यामध्ये, नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी, नेरूळ व ऐरोली येथील 3 रूग्णालयांमध्ये नागरिकांना त्यांच्या सोयीच्या वेळी लस घेता यावी यादृष्टीने दिवसरात्र लसीकरण सुरू आहे. याशिवाय तुर्भे येथील माता बाल रूग्णालय तसेच 19 नागरी आरोग्य केंद्रांठिकाणी सकाळी 9 ते सायं. 5 वा. वेळेत लसीकरण करण्यात येत आहे.
यासोबतच वाशी सेक्टर 5 येथील ई.एस.आय.एस. रूग्णालयात जम्बो लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून त्याठिकाणी सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत 4 लसीकरण बूथ तसेच दुपारी 2 ते रात्री 8 या वेळेत 4 लसीकरण बूथ असे 8 बूथ कार्यान्वित आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कार्यान्वित केंद्रांवर आठवड्याचे सातही दिवस मोफत लसीकरण करण्यात येत आहे.
याशिवाय 16 खाजगी रूग्णालयांमध्येही लसीकरण करण्यात येत असून तेथे प्रतिडोस रू. 250/- इतक्या शासनमान्य दराने लसीकरण केले जात आहे. प्रत्येक व्यक्तीने ठराविक दिवसांच्या अंतराने लसीचे दोन डोस घेणे अनिवार्य असून कोव्हीशील्ड व कोव्हँक्सिन यापैकी ज्या लसीचा पहिला डोस घेतला आहे त्याच लसीचा दुसरा डोस घेणे आवश्यक आहे.
1 एप्रिलपासून 45 वर्षावरील सर्वच व्यक्तींना लसीकरण करण्यास सुरूवात करण्यात आली असून दोनच दिवसात 45 ते 60 वयोगटातील 8847 नागरिकांनी कोव्हीड लस घेतलेली आहे.
कोव्हीडची लस घेतलेल्या कोणत्याही नागरिकास मोठ्या प्रमाणात त्रास झालेला नसून ही लस पूर्णत: सुरक्षित आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी व लसीकरणासाठी आपला क्रमांक येईल तेव्हा अवश्य लस घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.