नवी मुंबई महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांचे माध्यमिक शालांत (एस.एस.सी.) परीक्षेत उज्ज्वल यश
सानपाडा माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी पुजा वंजारे 94 टक्के गुणांसह नमुंमपा विद्यार्थ्यांमध्ये सर्वप्रथम
सुनील तावडे – संपादक
माध्यमिक शालांत (एस.एस.सी.) परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला असून नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उज्ज्वल यश मिळविलेले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांमधून नमुंमपा माध्यमिक शाळा क्र. 116, सानपाडा येथील पूजा शिवाजी वंजारे ही विद्यार्थिनी 94.00 टक्के इतके सर्वाधिक गुण मिळवून महानगरपालिका शाळांमध्ये सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे.
नमुंमपा माध्यमिक इंग्रजी शाळा क्रमांक 120, दिवागाव येथील वैष्णवी रमेश राठोड ही विद्यार्थिनी 93.00 टक्के गुण मिळवून व्दितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय नमुंमपा माध्यमिक शाळा क्र. 104, राबाडा येथील विद्यार्थिनी निहारिका वर्मा आणि अर्पिता यादव त्याचप्रमाणे नमुंमपा माध्यमिक इंग्रजी शाळा क्रमांक 120, दिवागाव येथील विद्यार्थी स्वहम पीतांबर पात्रा या तिन्ही विद्यार्थ्यांनी 91.60 टक्के गुण संपादन करीत नवी मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांतून संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळविला आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणा-या मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीकरीता मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या एकूण 23 माध्यमिक शाळांमधून 2812 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 2674 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांचा एकूण सरासरी निकाल 93.61 टक्के एवढा लागला आहे.
महानगरपालिकेच्या 23 माध्यमिक शाळांमधून शाळा क्रमांक 116, सानपाडा, शाळा क्रमांक 118, पावणेगांव, शाळा क्रमांक 122, कोपरखैरणे गाव या 3 शाळांचा निकाल 100 टक्के आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दिले जाणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण व्हिजन एस.एस.सी. परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या गुणात्मक यशातून पुन्हा एकवार सिध्द झाले असून एस.एस.सी. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक सुविधा व शैक्षणिक दर्जा याबाबत पालकांमार्फत समाधान व्यक्त करण्यात आले आहे.