नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारीवृंदास दिवाळीला 25 हजार सानुग्रह अनुदान
यावर्षी 2 नोव्हेंबर पासून दिवाळी सण सुरू होत असून नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांची दिवाळी आनंदात जावीयाकरिता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सन 2020-21 वर्षाकरिता महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी यांना रू. 25 हजार तसेच करार / तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचारी यांना रू. 19 हजार व आशा वर्कर यांना 9 हजार रक्कमेचे सानुग्रह अनुदान जाहीर केलेले आहे.
यामध्ये महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक तसेच राज्य शासनाकडील बदलीने, प्रतिनियुक्तीने वा प्रशिक्षणार्थी असलेले अधिकारी – कर्मचारी यांना रू. 25 हजार सानुग्रह अनुदान दिले जात आहे.
त्याचप्रमाणे किमान वेतनावरील तात्पुरत्या स्वरूपात करार पध्दतीवरील वेतनश्रेणीमध्ये कार्यरत असणारे अधिकारी – कर्मचारी, रोजंदारीवरील आरोग्य सेवक, मानधनावरील बालवाडी शिक्षक व मदतनीस यांना रू. 19 हजार इतकी सानुग्रह अनुदान रक्कम प्रदान केली जाणार आहे.
याशिवाय सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शासनाने कंत्राटी तत्वावर नेमलेले व शासनाकडून मानधन प्राप्त होणा-या कंत्राटी कर्मचा-यांनाही करार पध्दतीवरील कर्मचा-यांप्रमाणे रू. 19 हजार इतके सानुग्रह अनुदान त्याचप्रमाणे आरोग्य विभागातील आशा वर्कर यांना रू. 9 हजार सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे.
तसेत आरोग्य विभागातील आशा वर्कर यांनाही रू. 9 हजार इतकी सानुग्रह अनुदान रक्कम दिली जाणार आहे.
अशाप्रकारे एकूण 4582 अधिकारी, कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान देण्यास महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी मान्यता दिली असून दिवाळीपूर्वीच ही रक्कम अधिकारी, कर्मचारी यांच्या हातात मिळणार असल्याने त्यांची दिवाळी आनंदात जाणार आहे.
कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी अगदी सुरूवातीपासून अत्यंत सेवाभावी वृत्तीने काम करीत आहेत. या कामाची नोंद घेत आयुक्तांनी सानुग्रह अनुदान वितरणाबाबत घेतलेल्या या कर्मचारीहिताय निर्णयाचे महापालिका अधिकारी-कर्मचारी वृंदाकडून स्वागत करण्यात येत आहे.