नवी मुंबई

राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त 21 ते 28 सप्टेंबर या कालावधीत विशेष मोहीम

राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात दि. २१ ते २८ सप्टेंबर २०२१ या कालावधीत ‘राष्ट्रीय जंतनाशक मोहीम’ राबविण्यात येत आहे. यामध्ये – १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना वयोगटानुसार निश्चित केल्याप्रमाणे जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. ज्या शाळा सुरु आहेत त्या शाळांमध्ये हजर असणाऱ्या मुलामुलींना शिक्षकांद्वारे तसेच अंगणवाडीमध्ये जाणाऱ्या मुला-मुलींना अंगणवाडी शिक्षकांद्वारे गोळी देण्यात येईल. शाळेत न जाणाऱ्या मुला-मुलींना आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवक यांच्याकडून गृहभेटीद्वारे गोळी देण्यात येईल.

१ ते १९ वयोगटातील किमान २८ टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमीदोष मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतांपासून होतो. परिसर स्वच्छतेचा अभाव असणे हे याचे एक प्रमुख कारण आहे. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण असून त्यामुळे बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटते. ही महत्वाची बाब लक्षात घेऊन या आजारांचा प्रतिबंध करण्याच्या उद्देशातून राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविली जात आहे.

जंताचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंतनाशक गोळी घेण्याबरोबरच हात स्वच्छ धुणे, शौचालयाचा वापर करणे, भाज्या व फळे स्वच्छ धुवून खाणे, नखे नियामित कापणे व स्वच्छ ठेवणे, बाहेर जाताना बूट अथवा चपलांचा वापर करणे अशी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 23 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत ही मोहींम राबविण्यात येत असून १ ते २ वयोगटातील मुला-मुलींसाठी २०० मिलिग्रॅमची गोळी चुरा पावडर करूनच पाण्याबरोबर देण्यात येईल. २ ते १९ वयोगटातील मुला-मुलीना ४०० मिलिग्रॅमची गोळी चुरा अथवा तुकडे करून चावून खाण्यास स्वच्छ पाण्याबरोबर देण्यात येणार आहे. अलबेंडेझोलची गोळी उपाशीपोटी देण्यात येणार नाही. गोळी खाल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाही. तथापि जंताचा प्रादुर्भाव असल्यास किरकोळ पोटदुखी, जळजळ अथवा क्वचित प्रसंगी मुलांना उलटी होऊ शकते. हे दुष्परिणाम तात्कालिक किरकोळ स्वरूपाचे असल्याने पालकांनी घाबरून जाऊ नये.

ही मोहीम यशस्वीपणे राबविण्याकरिता सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले असून अभियानाची जनजागृती करण्यासाठी सर्वत्र फलक लावण्यात येत आहेत.

तरी नागरिकांनी आपल्या १९ वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना २१ ते २८ सप्टेंबर २०२१ या कालावधीत जंतनाशक गोळी देऊन रक्तक्षय व कुपोषणापासून प्रतिबंध करावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button