म्युकरमायकोसिस आजाराची तपासणी व उपचारासाठी नवी मुंबई महानगरपालिकेची व्यवस्था, तीन रुग्णालयात ओपीडी सुविधा तसेच वाशी रुग्णालयात उपचार सुविधा
कोव्हीडमधून बरे झाल्यानंतर मधुमेह, कॅन्सर असे आजार असणा-या तसेच अवयव प्रत्यारोपण झालेल्या त्याचप्रमाणे कोव्हीड उपचारादरम्यान स्टिरॉईड औषधे दिलेल्या काही रुग्णांमध्ये बरे होऊन घरी गेल्यानंतर 10 दिवस ते 6 आठवड्याच्या कालावधीत ब्लॅक फंगल बुरशीच्या वाढीमुळे म्युकरमायकोसिस या आजाराची लागण झाल्याचे दिसून येत आहे.
या आजाराचे काही रुग्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आढळले असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी याचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने महानगरपालिकेच्या वाशी, नेरुळ व ऐरोली येथील तिन्ही सार्वजनिक रुग्णालयात म्युकरमायकोसिस बाबत तपासणी करिता बाह्यरुग्ण सुविधा (OPD) कक्ष कार्यान्वित केले आहेत.
या तपासणीमध्ये एखादा म्युकरमायकोसिस बाधीत रुग्ण आढळल्यास त्यावर आवश्यक उपचार करण्याच्या सुविधाही महानगरपालिकेच्या वाशी सार्वजनिक रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या उपचारांमध्ये आवश्यक असलेली औषधे काहीशी महाग असल्याचे व त्याची मात्राही मोठ्या प्रमाणावर लागत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्या अनुषंगाने अशा रुग्णांच्या महानगरपालिकेच्या वाशी रुग्णालयातील उपचाराचा सर्व खर्च महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. या आजारावरील शस्त्रक्रिया विशिष्ट स्वरुपाची असल्याने याकरिता गरज भासल्यास खाजगी तज्ज्ञ डॉक्टरांचीही मदत घेतली जाणार आहे.
तीव्र डोकेदुखी, गाल दुखणे अथवा सुजणे, नाक बंद होणे अथवा दुखणे, नाक सतत वाहू लागणे, डोळे लाल होणे अथवा सुजणे, दृष्टी अधू होणे, एकच वस्तू डबल दिसणे, दात हलू लागणे ही या आजाराची काही लक्षणे असून ती दिसू लागल्यापासून आजार गंभीर स्वरुप धारण करण्याचा कालावधी अत्यंत कमी असल्याने याकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते.
तरी नागरिकांनी या आजाराशी निगडीत नाक, डोळे, गाल अशी चेह-याशी संबंधीत लक्षणे आढळल्यास जरासेही दुर्लक्ष न करता त्वरीत महानगरपालिकेच्या वाशी, नेरुळ व ऐरोली या तिन्ही रुग्णालयांपैकी नजीकच्या रुग्णालयातील बाह्यरुग्ण सेवा कक्षात तपासणी करून घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.