‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत जागतिक ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
माझी वसुंधरा अभियानामध्ये नवी मुंबई महानगरपालिका राज्यात व्दितीय क्रमांकाचे शहर म्हणून मानांकीत झाली असून यावर्षी अभियानाला सामोरे जाताना हे मानांकन उंचाविण्यासाठी महानगरपालिका सज्ज झालेली आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार जागतिक ऊर्जा संवर्धन दिनाचे औचित्य साधून प्रदूषणमुक्त वाहन असललेल्या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
से.21 नेरूळ येथील संत गाडगेबाबा स्मृतीवन (रॉक गार्डन) पासून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे 64 अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.
भुमी, जल, वायू, अग्नी व आकाश अशा निसर्गातील पंचतत्वांचा पर्यायाने निसर्गाचा ऱ्हास रोखण्यासाठी व पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशातून माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणशील विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शहरांमध्ये वाहनामुळे होणाऱ्या प्रदुषणावर उपाययोजना म्हणून प्रदुषण विरहित वाहनांचा वापर करून शहरामधील प्रदूषण रोखण्याचा संदेश या सायकल रॅलीच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आला.
या सायकल रॅलीच्या सांगता प्रसंगी महापालिका मुख्यालयातील माझी वसुंधरा अभियानाची सामुहिक शपथ घेण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, उद्यान विभागाचे उपआयुक्त श्री. जयदीप पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, वाहन विभागाचे उपआयुक्त श्री. मनोजकुमार महाले, बेलापूर विभाग अधिकारी श्रीम. मिताली संचेती आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जागतिक ऊर्जा संवर्धन दिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेच्या शाळांमध्येही माझी वसुंधरा अभियानांतर्गत सामुहिक शपथ विद्यार्थी, शिक्षक यांच्यामार्फत ग्रहण करण्यात आली.