महापालिका मुख्यालयात अधिकारी, कर्मचारी यांनी स्वेच्छेने रक्तदान करीत इतरांसमोर ठेवला आदर्श
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
नवी मुंबई महानगरपालिकेच्या रूग्णालयांचे मागील काही महिन्यांत अद्ययावतीकरण झाले असून तेथील आरोग्य सुविधांमध्येही वाढ झालेली आहे. या अनुषंगाने विविध प्रकारच्या आजारांवरील उपचारांसाठी अथवा शस्त्रक्रियांप्रसंगी रक्ताची गरज वाढली असून त्यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका वाशी सार्वजनिक रूग्णालयातील माँसाहेब मिनाताई ठाकरे रक्तपेढीमार्फत विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत असते.
यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यामधील इच्छुक रक्तदात्यांना रक्तदान करता यावे व या माध्यमातून महानगरपालिकेच्या रक्तपेढीतील रक्तसाठ्यामध्ये वाढ व्हावी यादृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार नमुंमपा आरोग्य विभागामार्फत महापालिका मुख्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये 104 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले, त्यामध्ये 10 महिला कर्मचा-यांनीही रक्तदान केले. रक्ताच्या प्रत्येक थेंबाचे महत्व अनन्यसाधारण असून त्यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो. असे सर्वश्रेष्ठ रक्तदान करणा-या या रक्तदात्यांना राज्य रक्त संक्रमण परिषद, महाराष्ट्र यांचे प्रशस्तिपत्र आणि सामायिक स्वैच्छिक रक्तदान काडे देण्यात आले. या कार्डव्दारे या रक्तदात्यांना महाराष्ट्रात कुठेही शासकीय रक्पोढीमध्ये रक्ताची एक बॅग उपलब्ध होऊ शकते.
आरोग्य विभागामार्फत महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरासाठी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे यांच्या नियंत्रणाखाली वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, नमुंमपा वाशी रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत जवादे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. प्रिती संघानी यांनी महत्वाची भूमिका बजावली.
कोव्हीड काळात रक्तदानाची शिबिरे आयोजित करण्यावर मर्यादा आली त्यामुळे रक्ताची कमतरता भासत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने त्यावरही मात करीत रक्तसाठा वाढविण्यावर भर दिला जात आहे. त्यामध्ये महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनीही रक्तदानासाठी पुढाकार घेत समाजासमोर चांगला आदर्श ठेवला आहे. यापुढील काळात जागेच्या उपलब्धतेनुसार महापालिका विभाग कार्यालयांमध्येही अशा प्रकारे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून ज्या व्यक्ती / संस्था यांना आपल्या सोसायटी, संस्था यामध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करावयाचे असेल त्यांनी 022-27888750 क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.