नवी मुंबई

मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणा-या 32 व्यक्तींवर कायदेशीर कारवाई प्रमाणेच त्यांची अँटिजेन टेस्टींग, त्यातील 2 पॉझिटिव्ह व्यक्तींची कोव्हीड सेंटरमध्ये रवानगी

महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या विविध प्रतिबंधांनुसार संचारबंदी लागू असून नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडणे अपेक्षित नाही. तरीही काही नागरिक मॉर्निग वॉक अथवा इव्हिनींग वॉकसाठी घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास येत असल्याने पोलीस विभागाच्या सहकार्याने नवी मुंबई महानगरपालिकेची पथके कारवाई करीत आहेत.

26 एप्रिलला बेलापूर विभाग अधिकारी तथा सहा,आयुक्त श्री. शशिकांत तांडेल यांनी एन.आर.आय.पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र पाटील यांच्यासह संयुक्तपणे कारवाई करीत एन.आर.आय. संकुल परिसरात संध्याकाळी इव्हिनींग वॉकसाठी विनाकारण घराबाहेर पडणा-या 18 व्यक्तींवर कारवाई करीत प्रत्येकी रू.1 हजार याप्रमाणे एकूण रू. 18 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल केली होती.

तथापि अशाप्रकारे मॉर्नींग, इव्हिनींग वॉकसाठी संचारबंदी असूनही घाराबाहेर पडणा-या नागरिकांबाबत गांभीर्याने बाळगत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये अडथळा आणणा-या नागरिकांविरोधात कायदेशीर कारवाई प्रमाणेच त्यांची तिथेच कोव्हीड टेस्ट करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

त्याच्या अंमलबजावणीस आज सुरूवात करण्यात आली असून बेलापूर विभागात ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या 32 व्यक्तींवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची तिथेच अँटिजेन टेस्टींगही करण्यात आली आहे. यामध्ये चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या 2 कोरोना बाधित व्यक्तींना संबंधित नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिका-यांना सूचित करून कोव्हीड केंद्रात दाखल करण्यात आलेले आहे.

कोव्हीड विरोधातील लढा हा सर्व नागरिकांनी समविचाराने परंतू एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवून लढावयाचा आहे. यामध्ये सर्वांच्याच आरोग्य हितासाठी कोव्हीड नियमांचे व शासन आदेशांचे प्रत्येकाने पालन करणे अत्यंत गरजेचे असून नागरिकांनी त्याकरिता संपूर्ण सहकार्य करावे व कारवाईची कटू वेळ येऊ देऊ नये असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Attachments area

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button