“मिशन युवा स्वास्थ्य” मोहिमेअंतर्गत 1389 विद्यार्थ्यांचे कोव्हीड लसीकरण
25 ऑक्टोबर पासून 2 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार ‘मिशन युवा स्वास्थ्य’ लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली असून नवी मुंबई महानगरपालिकेने 22 ऑक्टोबरपासूनच मोहिमेला सुरूवात केलेली आहे. या मोहिमेअंतर्गत 22, 23 व आज 25 ऑक्टोबर या 3 दिवसात एकूण 1389 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे 20 महाविद्यालयांमध्ये लसीकरण करण्यात आलेले आहे.
महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू व्हावीत यादृष्टीने हा महत्वपूर्ण उपक्रम राज्यभर राबविला जात असून कोणत्याही उपक्रमात पुढाकार घेणा-या नवी मुंबई महानगरपालिकेने या मिशन युवा स्वास्थ्य लसीकरण मोहिमेतही आघाडी घेतलेली आहे.
विविध नामांकीत शिक्षण संस्थांची महाविद्यालये असणा-या नवी मुंबईची एज्युकेशनल हब अशीही ओळख आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेने महाविद्यालयात जाऊन लसीकरण करण्याचे संपूर्ण नियोजन करीत 22 ऑक्टोबरपासूनच लसीकरणाला सुरूवात केलेली आहे. त्या अंतर्गत 22 ऑक्टोबरला 10 महाविद्यालयांमध्ये 407 विद्यार्थ्यांचे तसेच 23 ऑक्टोबर रोजी 595 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.
आज 25 ऑक्टोबर रोजी एस. के. कॉलेज, सेक्टर 25 नेरुळ – 70 विद्यार्थी, एसआयईएस कॉलेज नेरूळ – 100 विद्यार्थी, वेस्टर्न कॉलेज, सानपाडा – 20 विद्यार्थी, ओरिएन्टल कॉलेज, सानपाडा – 90 विद्यार्थी, टिळक कॉलेज, सेक्टर 28, वाशी – 20 विद्यार्थी, मॉर्डन कॉलेज, सेक्टर 16ए वाशी – 26 विद्यार्थी, आयसीएल कॉलेज, सेक्टर 9 ए, वाशी – 50 विद्यार्थी, डीव्हीएस उच्च महाविद्यालय, कोपरखैरणे – 10 विद्यार्थी, गहलोत महाविद्यालय, कोपरखैरणे – 7 विद्यार्थी, लोकमान्य टिळक कॉलेज, कोपरखैरणे – 50 विद्यार्थी, इंदिरा गांधी इंजि. कॉलेज, घणसोली – 10 विद्यार्थी, दत्ता मेघे इंजि. कॉलेज ऐरोली – 50 विद्यार्थी अशाप्रकारे आज 12 महाविद्यालयांमध्ये 387 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.
“मिशन युवा स्वास्थ्य” मोहिम 2 नोव्हेंबरपर्यंत सर्व महाविद्यालयांमध्ये राबविली जात असून पहिला व दुसरा कोव्हिशिल्ड डोस तसेच कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जात आहे.
तरी विद्यार्थ्यांप्रमाणेच प्राध्यापक, प्राध्यापिका आणि इतर कर्मचारी यांचेही लसीकरण झाले नसल्यास वा दुस-या डोसचा विहित कालावधी पूर्ण झाला असल्यास लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने कऱण्यात येत आहे.