‘मिशन कवच कुंडल’ अंतर्गत आता रूग्णवाहिकेमार्फत ‘कोव्हीड लसीकरण आपल्या दारी’
कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण होऊन ते संरक्षित व्हावेत हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवण्यात आले असून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘मिशन कवच कुंडल’ ही विशेष कोव्हीड 19 लसीकरणमोहीम 14 ऑक्टोबरपर्यंत राबविली जात आहे. इतर मोहीमांप्रमाणेच ही मोहीमदेखील यशस्वीरित्या राबविण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिका सज्ज असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सर्व वैद्यकीय अधिका-यांशी दूरदृष्यप्रणालीव्दारे संवाद साधत या मोहीमेचे नियोजन केले आहे.
‘मिशन कवच कुंडल’ मोहीमेअंतर्गत रूग्णवाहिकांमध्ये रूपांतरित केलेल्या बसेसव्दारे ठिकठिकाणी जाऊन कोव्हीड 19 लसीकरण करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात दुर्गम कॉरी क्षेत्र व इतर दुर्लक्षित भागांकडे लक्ष दिले जाणार आहे. त्याकरिता 10 रूग्णवाहिका कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या 23 नागरी आरोग्य केंद्र क्षेत्रातील 160 ठिकाणे पहिल्या टप्प्यातील या विशेष लसीकरणाकरिता निश्चित करण्यात आली आहेत. 11 ऑक्टोबरपासून ‘मिशन कवच कुंडल’ मोहीमेअंतर्गत ‘कोव्हीड लसीकरण आपल्या दारी’ या विशेष लसीकरणाला सुरूवात होत असून 10 रूग्णवाहिकांपैकी प्रत्येक रूग्णवाहिका दर दिवशी 9 ते 11, 11 ते 1, 2 ते 4 आणि 4 ते 6 अशा वेळांमध्ये निश्चित केलेल्या ठिकाणी उभी राहून कोव्हीड लसीकरण करणार आहे. नागरिकांना याची माहिती होण्यासाठी संबंधित नागरी आरोग्य केंद्रांमार्फत त्या परिसरात माईकींगव्दारे माहिती प्रसारण व जनजागृती केली जाणार असून प्रत्येक जागेवर लाभार्थ्यांनी लसीकरणासाठी आणण्याकरिता 3 ते 4 स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
कोव्हीड लसीकरणासाठी येणा-या प्रत्येक लाभार्थ्यांची शासकीय कोविन पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार असून त्याठिकाणी कोव्हीड सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन केले जावे असे स्पष्ट निर्देश आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
कोव्हीड लसीकरणापासून एकही घटक वंचित राहू नये याची काळजी महानगरपालिकेने अगदी सुरूवातीपासूनच घेतली असून दुर्गम कॉरी क्षेत्र, रेडलाईट एरिया, बेघर व निराधार व्यक्ती, तृतीयपंथीय, दिव्यांग अशा विविध समाज घटकांचे विशेष सत्र राबवून लसीकरण केले आहे. त्याचप्रमाणे केमिस्ट, मेडिकल स्टोअर्स, रेस्टॉरंट, सलून, ब्युटी पार्लर, पेट्रोल पंप, टोल नाका याठिकाणी काम करणारे कर्मचारी तसेच रिक्षा – टॅक्सी चालक, सोसायट्यांचे वॉचमन, घरकाम करणारे महिला – पुरूष कामगार अशा अनेक नागरिकांशी मोठ्या प्रमाणावर संपर्क येणा-या कोरोनाच्या दृष्टीने संभाव्य जोखमीच्या व्यक्तींकरिताही (Potential Superspreaders) विशेष लसीकरण सत्रांचे सातत्याने आयोजन केले जात आहे. यापुढे जात *आजपासून आधार कार्ड नसलेल्या व्यक्तींकरिताही विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 18 वर्षावरील 10 लक्ष 80 हजार 817 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला असून 5 लक्ष 46 हजार 24 नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत लसीकरणाचे हे प्रमाण राज्यातील मोठ्या शहरांमध्ये सर्वाधिक आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेस सप्टेबर महिन्यापासून कोव्हीड लसीचे मोठ्या प्रमाणावर डोस उपलब्ध झाल्याने लसीकरणाला वेग आलेला आहे. नागरिकांना त्यांच्या घरापासून जवळ सोयीस्करपणे लस घेता यावी याकरिता 101 लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये आता ‘मिशन कवच कुंडल’ मोहीम प्रभावीरित्या राबविण्यासाठी पहिल्या टप्प्यात 10 बसेस स्वरूपातील रूग्णवाहिका सज्ज असून नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा आणि त्वरित लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.