विविध स्पर्धात्मक उपक्रमांतून दिव्यांग विद्यार्थ्यांनी उधळले सांस्कृतिक कलारंग
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
दिव्यांग सक्षमीकरणासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्व प्रकारच्या दिव्यांगांना एकाच छताखाली विविध प्रकारच्या शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणा-या दिव्यांग मुलांकरिताही विविध उपक्रम राबविले जातात.
3 ते 9 डिसेंबर दरम्यान जागतिक समान संधी सप्ताहांतर्गत जगभरात दिव्यांगांकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत. या अनुषंगाने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना वाव देण्याकरिता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमामध्ये कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांमधील दिव्यांग विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. तसेच त्यांचे पालकही त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.
यामध्ये वेशभूषा, नृत्य, चित्रकला, वक्तृत्व, गायन, खेळ अशा विविध उपक्रमांचे शिक्षण विभागाचे उपआयुक्त श्री. जयदीप पवार यांच्या नियंत्रणाखाली स्पर्धात्मक आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, ठाणे जिल्हा डायटचे विभागप्रमुख श्री. दिनेश चौधरी व ठाणे जिल्हा समन्वयक श्री. कुऱ्हाडे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या सुप्त गुणांचे कौतुक करीत या माध्यमातून त्यांच्या आंतरिक कलेला वाव मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध शाळांमधील 185 दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विविध स्पर्धा उपक्रमांतील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनीही या उपक्रम आयोजनाबद्दाल समाधान व्यक्त केले.