नवी मुंबई

मायक्रो कन्टेनमेंट झोनच्या नियमांचे उल्लंघन करणा-या 5 सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई

कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी कन्टेनमेंट झोनमधील प्रवेश प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे बारकाईने लक्ष देण्याचे महत्व लक्षात घेत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सर्व विभाग कार्यालयांच्या सहा. आयुक्तांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. सोसायटीमधील कन्टेनमेंट झोनच्या नियमावलीचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी दि. 5 एप्रिल 2021 रोजीच्या आदेशाव्दारे सोसायटी पदाधिका-यांवर सोपविण्यात आलेली आहे.

एखाद्या सोसायटीमध्ये पाचपेक्षा जास्त रूग्ण असल्यास ती सोसायटी मायक्रो कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येत असून सोसायटी कन्टेनमेंट म्हणून जाहीर झाली असल्याचे पत्र संबंधित सोसायटीच्या पदाधिका-यांना देण्यात येत आहे व सोसायटीच्या प्रवेशव्दारावर तशा प्रकारचा फलकही दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात येत आहे.

अशा मायक्रो कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलेल्या सोसायटीमधून कोणत्याही नागरिकाचा आतमध्ये प्रवेश अथवा बाहेर जाणे प्रतिबंधीत आहे. या नियमाचा भंग झालेला आढळल्यास सोसायटीला पहिल्या वेळी रक्कम रू. 10 हजार दंड करण्यात येत आहे. तसेच दुसऱ्या वेळेस रक्कम रू. 25 हजार व तिसऱ्या वेळेपासून पुढे प्रत्येक वेळी रक्कम रू.50 हजार इतका दंड आकारण्यात येत आहे.

अशाप्रकारे मायक्रो कन्टेनमेंट झोनच्या नियमांचे उल्लंघन करणा-या बेलापूर विभागातील सेक्टर 25 नेरूळ येथील विजयगड सोसायटी, वाशी विभागातील सेक्टर 1 मधील गणेश टॉवर आणि घणसोली विभागात सेक्टर 6 मधील महावीर मल्हार सोसायटी त्याचप्रमाणे तुर्भे विभागात सेक्टर 9 सानपाडा येथील मिलेनियम टॉवर मधील ए 1 आणि ए 5 या दोन इमारती अशाप्रकारे एकूण 5 सोसायट्यांवर प्रत्येकी रू. 10 हजार तसेच सेक्टर 15 बी टाईप मधील घराच्या सुरू असलेल्या बांधकामाठिकाणी कार्यरत मजूरांची कोरोना टेस्ट करून घेतलेली नसल्याने बांधकाम मालकावर रू. 10 हजार अशी दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.

कोरोनाची झपाट्याने वाढत असलेली साखळी खंडीत करण्यासाठी प्रत्येकाने जागरूक राहणे गरजेचे असून विशेषत्वाने ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित सापडले आहेत अशा सोसायट्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने कन्टेनमेंट झोनची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व नागरिकांनी व सोसायट्यांनी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

2 Attachments

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button