मराठी रंगभूमी दिनानिमित्त भावे नाट्यगृहात रंगला अलबत्या गलबत्याचा प्रयोग
(नवी मुंबई) मराठी नाट्य रंगभूमी व पाडव्याच्या शुभ मुहूर्त साधून वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात तब्बल अठरा महिन्यानंतर अलबत्या गलबत्या या सुपरहिट नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला. एकाच दिवशी सकाळ व दुपार सत्रात असे दोन प्रयोग पार पडले. नाटकाला आधीपासूनच प्रेक्षक विशेषता बाल प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आजच्या प्रयोगाला राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड या आपल्या कुटुंबासमवेत उपस्थित होत्या. मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधत त्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत आद्य नाटककार विष्णुदास भावे यांचे अभिवादन करण्यात आले. यावेळी अलबत्या गलबत्या या नाटकाचे निर्माते राहुल भंडारे आणि तुषार सूर्यवंशी सुद्धा उपस्थित होते.
तुषार सूर्यवंशी यांनी शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. विशेष म्हणजे निर्माता तुषार सूर्यवंशी यांचा तिकीट विक्रेता ते निर्माता हा प्रवास सर्वांना प्रेरणादायी ठरणारा आहे.