नवी मुंबई

मलेरिया, डेंग्यू व साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी घरी येणा-या कर्मचा-यांना सहकार्य करावे – आयुक्त अभिजीत बांगर

– कोव्हीड प्रभावीत काळातही मलेरिया, डेंग्यू व साथरोग प्रतिबंधाकडे महानगरपालिकेचे लक्ष
– प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी घरी येणा-या कर्मचा-यांना सहकार्य करण्याचे आयुक्तांचे आवाहन

कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेची तयारी करत असताना पावसाळी कालावधीत उद्भवणा-या साथरोग तसेच मलेरिया, डेंग्यू या आजारांचा प्रादुर्भाव वाढणार नाही याकडेही काटेकोर लक्ष द्यावे असे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी निर्देश दिले. महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात साथरोगाशी संबंधीत अधिकारी, कर्मचारी यांच्या विशेष आढावा बैठकीप्रसंगी आयुक्तांनी मागील वर्षी कोव्हीड प्रादुर्भावाच्या काळात मलेरिया, डेंग्यू यांचे प्रमाण कमी असले तरी यावर्षी अधिक सावधपणे साथरोग प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी असे सूचित केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला ओतूरकर व संबंधीत अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. विविध नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी वेबीनारव्दारे सहभागी होते.

यावेळी मलेरिया, डेंग्यू प्रतिबंधात्मक करण्यात येणा-या कार्यवाहीची सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती घेत आयुक्तांनी मागील काही वर्षांतील अनुभव लक्षात घेता जोखमीच्या भागांमध्ये अधिक लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देशित केले. विशेषत्वाने बांधकाम सुरु असलेली एकही साईट तपासणी शिवाय सुटता कामा नये असे आदेश देत त्याठिकाणी काम करणा-या मजुरांची ब्लड टेस्ट करून घ्यावी व या साईट्सवर डास उत्पत्ती होणार नाही याची नियमित तपासणी करावी असेही सूचित केले.

सध्या विविध विभागातील शाळांमध्ये लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आली असून त्याठिकाणी नियमितपणे धुरीकरण / औषध फवारणी करण्यात यावी असेही सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे खाडी किना-यालगतच्या खारफुटी जवळच्या वसाहती / सोसायटी याठिकाणी डासांच्या उपद्रवाची इतरांपेक्षा जास्त शक्यता लक्षात घेता तेथे तक्रार / मागणीची वाट न पाहता पुढाकार घेऊन नियमितपणे रासायनीक धुरीकरण करावे असे सूचित केले. धुरीकरणाबाबत मागणी करण्यात आल्यास त्याठिकाणी कार्यवाही करण्याचेही आयुक्तांनी निर्देशित केले.

पावसाळी कालावधीत रोगराईचे प्रमाण वाढू नये याकरिता स्वच्छता ही तितकीच महत्वाची गोष्ट असून सार्वजनिक / सामुदायिक शौचालयांची नियमित सफाई व त्याठिकाणी कोव्हीड प्रतिबंधात्मक निर्जंतुकीकरण फवारणी नियमितपणे केली जाईल याचीही काळजी घेण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. कोपरखैरणे येथील जुन्या गाड्या, साहित्य टाकलेल्या डंपींगच्या ठिकाणी टायर, इतर वस्तू यामध्ये पाणी साठून डास उत्पत्ती होऊ नये याचीही काळजी घेण्याच्या तसेच त्याठिकाणीही नियमित धुरीकरण करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

पावसाळी कालावधीत उद्भवणारे जलजन्य आजार, साथरोग, मलेरिया, डेंग्यू असे आजार टाळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सतर्क असून नागरिकांनी घरांमध्ये तसेच घराभोवती पाणी साचून त्यामध्ये डास उत्पत्ती होणार नाही याकडे लक्ष द्यावे त्याचप्रमाणे घरामधील फुलदाण्या, कुंड्यांखालचे व फ्रिज डिफ्रॉस्ट ट्रे, एसी डक्ट, फेंगशुई यामध्ये साचलेले पाणी नियमित बदलावे, भंगार साहित्य व टायर्स योग्यप्रकारे नष्ट करावे, पाणी साठविण्याची भांडी व टाक्या झाकून ठेवाव्यात व आठवड्यातून एकदा स्वच्छ करून पूर्ण कोरड्या कराव्यात अशाप्रकारे काळजी घ्यावयाची आहे. त्याचप्रमाणे मलेरिया, डेंग्यू अथवा साथरोगांची लक्षणे आढळल्यास जवळच्या महापालिका रुग्णालयात जाऊन त्वरीत मोफत उपचार करून घ्यावयाचा आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने डास उत्पत्ती स्थाने शोधमोहिम प्रभावीरित्या राबविण्यात येत असून नागरिक / वसाहती, सोसायट्या यांचे पदाधिकारी यांनी आपल्याकडे यासाठी येणा-या महानगरपालिकेच्या कर्मचा-यांना ओळखपत्र पाहून डास उत्पत्ती स्थानांचा शोध घेण्यासाठी तसेच रुग्ण संशोधन कार्यवाहीसाठी व फवारणीसाठी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button