महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेची सागरी स्वच्छता मोहीम; पाच टन कचऱ्याची विल्हेवाट
उरण (दिनेश पवार) : महाराष्ट्राच्या ७२० किलोमीटर लांबीच्या समुद्र किनारपट्टीवरील ४० हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेच्या वतीने शनिवारी (११) सकाळी १० ते दुपारी १ वाजताच्या दरम्यान उरण-पीरवाडी व केगाव-माणकेश्वर सागरी किनारपट्टी भागात ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहीम’ राबविण्यात आली. मनसेद्वारे महाराष्ट्रात समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी व्हिडीओ शेअर करत या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
रायगड जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अतुल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या तीन तासांच्या सागरी किनारा स्वच्छता मोहिमेत तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी किनाऱ्यावर समुद्रात वाहून आलेल्या बॉटल, प्लास्टिक तसेच इतर तत्सम असा सुमारे पाच टन कचरा जमा करण्यात आला. त्यानंतर उरण नगरपरिषदेच्या सहकार्याने त्याची योग्य प्रकारे विल्हेवाटही लावण्याची आली.
या मोहिमेत रायगड, नवी मुंबईतील अनेक पदाधिकाऱ्यांनीही उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेच्या नव्याने सदस्यांचीही नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी दिली.