राजकीय

रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची तातडीने कार्यवाही व्हावी – आमदार प्रशांत ठाकूर यांची अन्न व औषधे प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडे मागणी

पनवेल (प्रतिनिधी)
रायगड जिल्हयातील विशेषतः पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोविड रुग्णांना उपचारासाठी अत्यावश्यक असणारे रेमडेसिव्हीर इंजेक्शन सहजरित्या उपलब्ध होण्याकरिता नेमणूक केलेल्या घाऊक विक्रेत्यांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे अन्न व औषधे प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी नामदार राजेंद्र शिंगणे यांना निवेदन दिले आहे. त्यांनी या निवेदनात म्हंटले आहे कि, रायगड जिल्ह्यातील विशेषतः पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोविड रुग्णांची संख्या पहाता कोविड रूग्णांना अत्यावश्यक असणारे रेमडेसिव्हीर इंजेक्शन नानासाहेब धर्माधिकारी उप जिल्हा रुग्णालय तसेच शासनाने मान्यता दिलेल्या कोविड सेंटर मध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे अनेक रूग्णांच्या नातेवाईकांना सदर औषधासाठी जास्त पैसे मोजून काळाबाजारातून खरेदी करावे लागत आहे. कित्येक वेळा इतर ठिकाणी रेमडेसिव्हीर इंजेक्शन न मिळाल्यामुळे अनेक रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे.

त्यातच कोविड रूग्णांना सदर औषध प्राप्त करून देण्यासाठी कोविड रूग्णालयांनी रेमडेसिव्हीर औषध साठा प्राप्त करून घेण्यासाठी रुग्णालयाच्या लेटर हेडवर सही शिक्क्यानिशी प्राधिकारपत्र व प्राधिकृत व्यक्तीचे फोटो ओळखपत्र घाऊक विक्रेत्याकडे सादर करणे आवश्यक असून सदर बाबतची खातर जमा करून घाऊक विक्रेत्यांनी औषधाचे सुयोग्य वितरण सदर आदेश संदर्भीय पत्राने जिल्हाधिकारी रायगड यांनी दिले आहे. सदर आदेश पहाता कोविड रुग्णांना उपचारासाठी लागणारे रेमडेसिव्हीर इंजेक्शन तातडीने मिळण्याचे अत्यंत गरज असताना सदर आदेशाची अंमलबजावणी करताना कोविड सेंटरना रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळण्यास विलंब होऊन अनेक कोविड रूग्ण दगावण्याची शक्यता बळावली आहे.

दररोज जिल्हयातील निरनिराळ्या विक्रेत्यांना रेमडेसिव्हीर औषधे पाठवली जातात व त्यांच्या मार्फत ती रायगड जिल्हयातील कोविड रूग्णांवर उपचार करण्यासाठी मान्यता मिळालेल्या रुग्णालयांना प्रत्यक्ष जाऊन स्वीकारावी लागतात. गेल्या काही दिवसात पनवेल परिसरातील रुग्णालयांना अशी औषधे अलिबाग, महाड येथे जाऊन आणावी लागली आहेत. प्रत्येक रुग्णालयाच्या प्रतिनिधीला तासनतास प्रवासात खर्चुन ही औषधे आणताना वेळ, पैसा सर्वाचाच अपव्यय होत आहे. मुंबई, नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून पनवेल येथे रायगड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कोविड रूग्ण पनवेल येथे उपचारासाठी दाखल होत आहेत. कोविड रुग्णांना उपचारासाठी लागणारे रेमडेसिव्हीर इंजेक्शन मोठया प्रमाणात पनवेलमधील घाऊक विक्रेत्यांकडेच मिळणे आवश्यक असताना पनवेल परिसरातील कोविड रूग्णालयांना सदर औषध उपलब्ध करताना विलंब होऊन अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे सदर औषध उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना जास्त रक्कम देऊन सदर इंजेक्शन विकत घ्यावे लागल्यामुळे काळाबाजार करणाऱ्यांना आयती संधी मिळणार आहे.

तरी या वस्तुस्थितीचे गांर्भीय लक्षात घेता रायगड जिल्हा अधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाचे फेरविचार करून पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोविड रुग्णांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन सहजरित्या कोविड रूग्णालयात उपलब्ध होण्यासाठी पनवेल परिसरातील घाऊक विक्रेत्यांना वितरण करण्यासाठी उपलब्ध करून देण्याबाबत आपणामार्फत तातडीने कार्यवाही व्हावे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवेदनात म्हंटले आहे. तसेच या संदर्भातील निवेदन अन्न व औषधे प्रशासन विभागाचे सचिव सौरभ विजय, अन्न व औषधे प्रशासन विभाग आयुक्त यांनाही देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button