कोव्हीडच्या दुस-या डोसच्या 100 टक्के लसीकरणाकडे गतीमान वाटचाल – प्रिकॉशन डोसवरही भर
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
कोरोना बाधीतांच्या संख्येत मागील काही दिवसांमध्ये घट होताना दिसत असून कोव्हीडची तिसरी लाट ओसरल्याचे चित्र पहायला मिळते आहे. तथापि कोव्हीड अजून संपलेला नाही याची जाणीव ठेवून मास्कचा नियमित वापर व कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करण्यासाठी महानगरपालिकेकडून जनजागृती केली जात आहे व भर दिला जात आहे.
18 वर्षावरील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालेले असल्यामुळे कोरोना बाधीतांची संख्या 4 हजारापर्यंत पोहचूनही रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण मर्यादित होते. त्यामुळे तिस-या लाटेची तीव्रता तितकीशी जाणवली नाही. नवी मुंबई महानगरपालिकेने लसीकरणाचे योग्य नियोजन केल्यामुळे व 102 पर्यंत लसीकऱण केंद्रे सुरु केल्यामुळे कोव्हीड लसीच्या पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करणारी नवी मुंबई ही पहिली महानगरपालिका होती. तोच वेग कायम राखत नवी मुंबई महानगरपालिकेने दुस-या डोसचेही लसीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे व नागरिक लस संरक्षित व्हावेत याकडे विशेष लक्ष दिले. त्या अनुषंगाने 10,93,341 नागरिकांना कोव्हीड लसीचे दोन्ही डोस दिलेले असून 98.76 टक्के नागरिक पूर्णत: लस संरक्षित झालेले आहेत.
यामध्ये –
लाभार्थी | पहिला डोस | दुसरा डोस | प्रिकॉशन डोस |
आरोग्य कर्मी (HCW) | 34492 | 23060 | 5911 |
पहिल्या फळीतील कोरोना योध्दे (FLW) | 30866 | 22048 | 6612 |
60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक | 99857 | 96415 | 18083 |
45 ते 60 वयोगटातील नागरिक | 24822 | 223602 | – |
18 ते 45 वयोगटातील नागरिक | 839934 | 705784 | – |
18 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाप्रमाणेच 15 ते 18 वयोगटातील कुमारांच्या पहिल्या डोसचेही 100 टक्के लसीकरण पूर्ण झाले असून त्यांच्या दुस-या डोसचेही लसीकरण गतीमानतेने पूर्ण करून घेण्यात येत आहे.
दुस-या डोसच्या लसीकरणाचेही सुव्यवस्थिती नियोजन करण्यात आले असून 23 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, 4 रुग्णालये, इएसआय रुग्णालय वाशी येथील जम्बो केंद्र, एपीएमसी मार्केटमधील दाणा बाजार व भाजी मार्केट तसेच जुईनगर रेल्वेकॉलनी आरोग्य केंद्र याठिकाणी दुस-या डोसची कोव्हीशिल्ड लसीकरण सुविधा उपलब्ध आहे. तसेच नवी मुंबई महानगरपालिकेची 4 रुग्णालये आणि इएसआय रुग्णालय वाशी येथील जम्बो केंद्र याठिकाणी कोव्हॅक्सिन लसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 15 ते 18 वयोगटातील कुमारवयीन मुलांच्या दुस-या डोससाठी शाळांमध्येही लसीकरण केंद्रे सुरु कऱण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
याशिवाय दुस-या डोससाठी पात्र असणा-या लाभार्थ्यांपर्यंत लसीकरण आपल्या दारी या विशेष मोहिमेअंतर्गत पोहचून दुस-या डोसच्या लसीकरणाचा वेग वाढविला जात आहे. याकरिता प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र पातळीवर 787 पथके कार्यरत असून 1 फेब्रुवारीपासून आत्तापर्यंत 3,79,918 गृहभेटी देऊन 15,889 लाभार्थ्यांना लसीकरणासाठी कार्ड वाटप करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे 60 वर्षावरील नागरिकांनी तिसरा प्रिकॉशन डोस घेण्यासाठीही विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दररोज होणा-या प्रिकॉशन डोसच्या लसीकरणातील लाभार्थी मानक-याचे छायाचित्र महानगरपालिकेच्या विविध समाज माध्यमांवरून प्रसारित करण्यात येत आहे. त्यामुळे प्रिकॉशन डोसच्या लसीकरणालाही वेग आला असून दररोज 550 पर्यंत ज्येष्ठ नागरिक प्रिकॉशन डोसचा लाभ घेताना दिसत आहेत.
कोव्हीडचा लाट ओसरताना दिसत असली तरी कोव्हीड अजून संपलेला नाही याची जाणीव ठेवून प्रत्येकाने मास्कचा वापर नियमित करावा तसेच सुरक्षित अंतर व इतर कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे. त्याचप्रमाणे कोव्हीड लसीच्या दुस-या डोसची तसेच प्रिकॉशन डोसची वेळ आल्यानंतर त्वरीत महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये जाऊन विनामुल्य लसीकरण करून घ्यावे आणि लस संरक्षित व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.