नवी मुंबई

कल्याण-डोंबिवली व भिवंडी महानगरपालिकेतील सफाईमित्रांचे नवी मुंबई महानगरपालिकेत प्रशिक्षण संपन्न:

केंद्र सरकारच्या वतीने देशभरात राबविण्यात येणा-या ‘सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज 2020-2021’ अभियानाच्या अनुषंगाने विविध शहरांमध्ये माहितीप्रद कार्यशाळा आयोजित करण्यात येत असून त्या कार्यशाळांच्या आरंभाचा मान 4 ते 6 जानेवारी 2021 या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झाला होता.

त्या अनुषंगाने महाराष्ट्र अर्बन डेव्हलमेंट मिशन डायरेक्टरेट यांच्या वतीने सूचित करण्यात आल्याप्रमाणे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार, आज कल्याण डोंबिवली आणि भिवंडी निजामपूर या दोन महानगरपालिकेच्या सफाईमित्रांची प्रशिक्षण कार्यशाळा नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील एम्फिथिएटर येथे संपन्न झाली.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, अभियानाचे नोडल अधिकारी तथा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, कार्यकारी अभियंता श्री. अजय संख्ये, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे, उपअभियंता श्री. वसंत पडघन तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे मलनि:स्सारण अभियंता श्री. अजित देसाई, भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे शौचालय व्यवस्थापन अधिकारी श्री. नितीन चव्हाण, कॅम फाऊंडेशनच्या अधिकारी डॉ. स्मिता सिंग, कॅम अव्हेडा इन्व्हायरो इंजि. चे उपाध्यक्ष श्री. हरीकुमार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

सिवेज लाईन्स, मॅनहोल आणि सेफ्टिक टँकची होणारी धोकादायक पध्दतीने मानवी सफाई पूर्णपणे थांबवून त्याठिकाणी यांत्रिकी पध्दतीने स्वच्छता करण्यास प्राधान्य देण्याचे मुख्य उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून राष्ट्रीय पातळीवर सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियान राबविले जात असून नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये याबाबत खूप आधीपासून सन 2005 पासूनच सिवेज लाईन्स, मॅनहोल आणि सेफ्टिक टँकच्या साफसफाईची कार्यवाही माणसांकडून न करता जेटींग, रिसायकलींग, रॉडींग अशा विविध प्रकारच्या यांत्रिकी पध्दतीने केली जात आहे.

या कार्यशाळेमध्ये सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज अभियानाच्या अंतर्गत करावयाच्या बाबींचा अंतर्भाव असणारे माहितीप्रद प्रशिक्षण देण्यात आले तसेच प्रात्याक्षिकांव्दारेही प्रत्यक्ष कार्यवाही प्रदर्शित करण्यात आली. यानिमित्त नाट्यसृष्टी कला संस्थेच्या कलावंतांनी नवी मुंबईत ठिकठिकाणी अभियानाच्या व्यापक जनजागृतीसाठी केलेल्या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले तसेच आरंभ क्रिएशन्सने निर्मिलेले जनजागृतीपर लघुपटही दाखविण्यात आले. या कार्यशाळेच्या आयोजनात नवी मुंबई महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता श्री. स्वप्निल देसाई, श्री. वैभव देशमुख, श्री. दिलीप बेनके यांनी महत्वाची भूमिका बजावली.

या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये सहभागी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 50 आणि भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या 23 सफाईमित्रांनी नवी मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेल्या या प्रशिक्षणातून विषयाचे अधिक चांगल्या प्रकारे आकलन झाल्याचे व प्रात्यक्षिकांमुळे प्रत्यक्ष कार्यवाहीची माहिती मिळाल्याचे अभिप्राय नोंदविले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button