जुलै महिन्यात 225 शाळांमध्ये विशेष कोव्हीड 19 लसीकरण मोहीम
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
कोव्हीड लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करीत जलद आणि मोठ्या प्रमाणावर लसीकरणाकडे विशेष लक्ष दिले आहे. 18 वर्षावरील नागरिकांच्या दोन्ही डोसची उद्दिष्टपूर्ती करणारी नवी मुंबई ही राज्यातील प्रथम क्रमांकाची महानगरपालिका ठरली. लहान मुलांच्या लसीकरणाकडेही महानगरपालिकेने तशाच प्रकारे काटेकोर लक्ष देत 100 टक्के लसीकरणाचे उद्दीष्ट नजरसमोर ठेवले आहे.
यामध्ये 15 ते 18 वयोगटातील 80973 कुमारवयीन मुलांना (110.36%) पहिला डोस देण्यात आला असून 64946 मुलांना (88.50%) दुसरा डोस देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे 12 ते 14 वयोगटातील 39510 मुलांना (83.25%) पहिला डोस तसेच 28977 मुलांना (61.05%) दुसरा डोस देण्यात आलेला आहे.
सध्या शाळांना सुरुवात झालेली असून लसीकरणाची 100 टक्के उद्दिष्टपूर्ती व्हावी याकरिता 30 जुलै पर्यंत शालेय विद्यार्थ्यांकरिता विशेष कोव्हीड 19 लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. 1 जुलै ते 30 जुलै या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 225 शाळांमध्ये लसीकरणाचे दिनांकनिहाय वेळापत्रक तयार कऱण्यात आले आहे. या महिन्याभरात 29646 मुलांना लसीकरण कऱण्यात येणार आहे. आज पहिल्या दिवशी न्यु होरायझन पब्लिक स्कूल, सेक्टर 19, ऐरोली येथे शालेय मुलांचे विशेष मोहिमेअंतर्गत लसीकरण कऱण्यात आले.
यामध्ये 12 ते 14 वयोगटातील मुलांना कोर्बिव्हॅक्स लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार असून 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे 1 जून 2022 पासून हर घर दस्तक मोहीम 2 राबविण्यास सुरुवात झाली असून त्या अंतर्गत 3318 नागरिकांचे लसीकरण कऱण्यात आले आहे. त्यामध्ये 18 वर्षावरील 1163 नागरिकांना कोव्हीड लसीचा दुसरा डोस तसेच 12 ते 18 वयोगटातील 190 मुलांना कोव्हीड लसीचा पहिला डोस आणि 433 मुलांना कोव्हीड लसीचा दुसरा डोस देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे 1532 आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे व 60 वर्षावरील नागरिक यांना प्रिकॉशन डोस देण्यात आलेला आहे.
आत्तापर्यंत 13 लाख 76 हजार 117 नागरिकांनी पहिला डोस, 12 लाख 31 हजार 315 नागरिकांनी दुसरा डोस तसेच 93 हजार 104 नागरिकांनी तिसरा म्हणजेच प्रिकॉशन डोस घेतले
लाभार्थी | पहिला डोस | दुसरा डोस | प्रिकॉशन डोस |
आरोग्य कर्मी (HCW) | 34509 | 23104 | 10054 |
पहिल्या फळीतील कोरोना योध्दे (FLW) | 30882 | 22105 | 10123 |
60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक | 100247 | 101482 | 40213 |
45 ते 60 वयोगटातील नागरिक | 245405 | 235965 | 32714(18 ते 59 वयोगट) |
18 ते 45 वयोगटातील नागरिक | 844591 | 754736 | – |
15 ते 18 वयोगटातील नागरिक | 80973 | 64945 | – |
12 ते 14 वयोगटातील नागरिक | 39510 | 28977 | – |
सद्यस्थितीत कोव्हीड बाधीतांची संख्या पुन्हा वाढताना दिसत असून कोव्हीड लसीकरण झालेल्या व्यक्तींमध्ये आजाराची तीव्रता कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोव्हीड लसीकरणाव्दारे लवकरात लवकर संरंक्षित करून घेणे गरजेचे असून नागरिकांनी स्वत:चे तसेच आपल्या मुलांचे कोव्हीड लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.