“आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार” – उंब्रजचे कवी श्री. भास्कर हांडे
जुन्नर तालुका ही वारक-यांची ह्रदयभूमी आहे. इथे जन्मलेल्या प्रत्येकावर ते संस्कार होतच असतात. याच पूण्यपावनभूमीत जन्मलेला, पण व्यावसायानिमित्त चित्रकलेची ‘पंढरी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या हाॅलंड येथे वास्तव्य करणा-या आंतरराष्ट्रीय किर्तीच्या चित्रकाराला ‘पंढरीचा पांडुरंग आणि पंढरीची वारी’ पुन्हा इथे ओढून आणतात. पुढे हाच चित्रकार संत तुकाराम महाराजांच्या जन्मचतु:शताब्दी निमित्त ‘वारी आणि पालखी’ आपल्या कलानुभवाचा विषय बनवतो. चित्र कलेतून वारीची व्यापक पार्श्वभूमी जगासमोर विशद करणारा हा जागतिक किर्तीचा चित्रकार म्हणजे उंब्रज येथील श्री. भास्कर एकनाथ हांडे होय. ‘वारकरी संप्रदायातील सामुदायिकता आणि सहकार्य या तत्वांना अनुसरून ‘वारी’ ही गोष्ट एकट्याने करण्याऐवजी त्यांनी आपल्या देशी – विदेशी कलाकार मित्रांनाही वारीत सामील करून घेतले, पालखी सोहळा हीच एक Mobil Art Academy बनवली अन् आपला कलानुभव समृद्ध करून टाकला’ असे साहित्य संमेलनाध्यक्ष डाॅ. सदानंद मोरे म्हणतात.
श्री. भास्कर हांडे यांचा जन्म जुन्नर तालुक्यातील उंब्रज येथे दि. २४ फेब्रुवारी १९५७ रोजी शेतकरी कुटुंबात झाला. भास्कर यांचे आजोळ उंब्रजमधील सुप्रसिद्ध दांगट परिवारच असल्याने ‘जुने उंब्रज गाव’ हेच त्यांचे बाल विश्व समृद्ध करणारे एकमेव ठिकाण होते. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण उंब्रज येथेच झाल्यानंतर मात्र या बालमनाला पहिला धक्का बसला आणि पुढील शिक्षणासाठी भास्कर यांना मुंबईला जावे लागले. लहानपणापासूनच चित्र कलेची आवड असल्याने ‘कमवा आणि शिका’ या संकल्पनेनुसार बाळकृष्ण आर्ट स्टुडिओत सिनेमाचे पोस्टर्स रंगविण्याचे काम भास्कर करत असे. येथेच श्री. गोपीनाथ कुकडे यांच्याशी परिचय होऊन मैत्री झाली आणि भास्कर हांडे जे.जे. कला महाविद्यालयाच्या प्रांगणात दाखल झाला. या महाविद्यालयीन काळात पुढे नावारुपाला आलेले संजय पवार, प्रदीप मुळ्ये, रघुवीर कुलकर्णी, नलेश पाटील, पुरुषोत्तम बेर्डे आणि सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उध्दवजी ठाकरे हे भास्कर हांडे यांचे समकालीन विद्यार्थी होते. या कालावधीत उपयोजित कलेसाठीच्या विद्यार्थी विभागाचे १९७९ आणि १९८१ या दोन वर्षांचे ‘महाराष्ट्र राज्य पुरस्कार’ भास्कर हांडे यांना प्राप्त झाले.
जे. जे कला महाविद्यालयाच्या प्रांगणात १९७८ साली कवी अरूण कोल्हटकर यांच्या कविता हा एक अतिचर्चेचा विषय होता. अप्रत्यक्षपणे त्यांच्या कवितांकडे आकर्षित होणे, त्यांचे वाचन करणे यामुळे भास्कर यांना कविता उमजू लागली. महाविद्यालयीन पाच वर्षाच्या काळात मराठीतील अनेक सुप्रसिद्ध कवींचा प्रत्यक्ष सहवास लाभल्याने कविता लिहीण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि भास्कर हांडे यांचा कवी म्हणूनही उदय झाला. पंरतु जाणीवपूर्वक वेगळा मार्ग शोधून चित्रकलेचे उच्च शिक्षण घेण्यासाठी डिसेंबर १९८२ साली हाॅलंडला जाण्याचा निर्णय झाला. यामध्ये मित्रांनी फार मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन केले. भास्कर हांडे यांनी १९८४ मध्ये हाॅलंड येथील राॅयल ॲकॅडमीमध्ये पदव्युत्तर पदविका संपादन केली. व्यवसाय आणि कलानुभवाच्या दृष्टीने समृद्ध होण्यासाठी त्यांना हाॅलंडमध्येच स्थायीक होण्याचा निर्णय घ्यावा लागला. भास्कर हांडे यांना चित्रकलेइतकीच कवितासुद्धा महत्वाची वाटत होती. कवितेतून मातृभाषा आणि मराठी संस्कृतीशी त्यांची नाळ घट्ट जोडलेली होती. यातूनच एका चित्रकार – कवीच्या गेल्या दहा वर्षाच्या जीवनानुभवाचा आलेख मांडणारा ‘दशक’ हा पहिला कविता संग्रह १९९० साली प्रकाशित झाला. या कविता संग्रहाला संत तुकाराम महाराजांचे अभ्यासक श्री. दिलीप पुरुषोत्तम चित्रे अशा दिग्गजांची प्रस्तावना लाभली.
श्री. भास्कर हांडे यांना त्यांच्यातील चित्रकाराने आधुनिक जगात आणून सोडले होते, त्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झाली होती. परंतु १९७६ साली कधीही भरून न येणारी काळजाला झालेली जखम अजूनही भळभळतच होती. त्यांचा जन्माचा गाव एका नव्याने बांधण्यात येणा-या धरणाखाली बुडाला होता. अचानक ती जागाच नाहीशी झाली ; आता तिथे फक्त एक जलाशय होता. भास्कर हांडे यांना वस्तुस्थितीचा स्विकार करावाच लागला. जीवनात बदल होतात तसेच जगातही बदल होतात. परंतु जगात झालेले असे विलक्षण बदल कलावंत, कवीला ग्रहणासारखं ग्रासून टाकतात. भास्कर हांडे यांचा गाव हरवण्याचा अनुभव एक सर्वांगीण हादरा होता. तो कवितांच्या आणि चित्रांच्या रूपाने प्रक्षेपित होऊन ‘गाव बुडाला बुडाला गाव’ हा कविता संग्रह १९९५ साली प्रकाशित झाला. सान्तान राॅड्रिग्ज या इंग्रजी लेखकाने या कविता संग्रहाचे फार सुरेख वर्णन केले आहे. तो म्हणतो,’आपल्या गावासारखं गाव शोधत भास्कर हांडे भारतात आणि युरोपात चौफेर हिंडला पण कुठेच त्याला आपल्या हरवलेल्या गावाशी साम्य असलेला गाव आढळला नाही आणि अखेर त्याला आपल्या नजरेसमोरचा गाव अविष्कृत करण्यासाठी वापरावे लागले शब्द आणि रंग. त्यांचा जुना गाव हे एक अमूर्त जग आहे आणि पुनर्वसन झालेल्या धरणग्रस्तांची नवी वस्ती ही वस्तुस्थिती आहे,’ याचे अत्यंत प्रभावी वर्णन चित्रकार, कवी भास्कर हांडे यांनी या कविता संग्रहात केले आहे.
श्री. भास्कर हांडे यांना स्वत:ला प्रवासाची हौस आहे. मात्र हा प्रवास करताना त्यांच्यातील कलाकाराची नजर सतत नाविन्याचा शोध घेत असते. अशावेळी ‘पंढरपुरची वारी’ नावाचा अद्भूत सोहळा त्यांच्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते. यापूर्वी त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांवर आणि असंख्य वारक-यांचा प्रेमस्वरूप विठ्ठल या महत्वाच्या विषयांवरील अनेक चित्रे आणि शिल्पे निर्माण केली आहेत, या कलाकृतींची जगभर प्रदर्शने भरवलेली आहेत. डोळे दिपवून टाकणारा ‘पालखी सोहळा’, त्याच्या विविधांगी छटा अनेक साहित्यकांनी शब्दबद्ध केल्या आहेत. परंतु आता एका चित्रकाराने आपल्या कुंचल्यातून ‘तुझे रूप माझे देणे’ या प्रकल्पातून अशा सर्व घटनांची प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न केला आहे. प्राचार्य रामदास डांगे म्हणतात, ‘वारीचा हा चित्ररूप इतिहास उद्याच्या पिढीला एक नवे दर्शन घडविल यात शंका नाही आणि श्री. भास्कर हांडे यांच्यासारखा जागतिक किर्तीचा भारतीय चित्रकार हा झपाटल्यासारखं या क्षेत्रात उतरतो तेंव्हा एक चित्ररत्न खचितच एक नवे दालन रसिकांना खुले होत आहे.’ श्री. भास्कर हांडे यांनी सन २०१२ पासून आतापर्यंत पाचवेळा आपल्या देशी विदेशी मित्रांसह देहू – आळंदी – पंढरपुर अशी आषाढी पायी वारी केली आहे.
आषाढी वारीच्या निमित्ताने सन २०१२ पासून दरवर्षी एका वारकरी संतांच्या जीवनावर आधारित ‘रिंगण’ हा विशेष अंक प्रकाशित केला जातो. संपादक श्री. सचिन परब, चित्रकार श्री. भास्कर हांडे, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यासाठी विशेष मेहनत घेतात. आतापर्यंत संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत सोपानकाका, संत नरहरी सोनार, संत गोरा कुंभार, संत निवृत्तीनाथ, संत विसोबा खेचर अशा संतांची सर्वांगीण संशोधनात्मक माहिती या विशेषकांतून देण्याचा प्रयत्न केला जातो. या संशोधनातूनच भारतात संत नामदेवांची सर्वाधिक मंदिरे असल्याची माहिती मिळते. या अंकावरील मुखपृष्ठावर श्री. भास्कर हांडे यांच्या कुंचल्यातून साकारलेले संताचे चित्र तर असतेच पण लेखही असतो. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांवर श्री. भास्कर हांडे यांनी आतापर्यंत चारशेहून आधिक चित्रे साकारली आहेत. युरोपमध्ये महाराष्ट्राच्या कलेची पताका भास्कर हांडे गेली अनेक वर्षे अभिमानाने फडकावित आहेत. त्यांच्या चित्र प्रदर्शनांनी युरोपातील अनेक शहरं गाजवली आहेत. परदेशी नागरिक श्री. हांडे यांच्या चित्र शिल्पामागील विचार जाणून घेतात आणि भारावून जातात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी। कर कटावरी ठेवूनिया ॥ तुळशीहार गळा कासे पितांबर । आवडे निरंतर हेचि ध्यान ॥ हा अभंग साध्या – सोप्या शिल्पातून साकार रूप घेऊन सामोरा येतो. लाकडी चौकटीवर गोलाकार वाटोळा लाकडाचा गोळा किंवा काळ्या लाकडी तिरप्या चौकटीवर लहान मोठे होत जाणारे तीन लाकडी गोळे यातून विठ्ठल मूर्ती प्रकटते.
औंध, पुणे येथील ‘वैश्विक कला पर्यावरण” या तीन मजली इमारतीत श्री. भास्कर हांडे यांनी त्यांची सर्व चित्रे रसिकांसाठी तसेच कलेच्या अभ्यासकांसाठी खुली ठेवली आहेत. यातील एक संपूर्ण मजला हा संत तुकाराम महाराज यांच्यावर आणि संत साहित्यावर साकारलेल्या चित्रांचा आहे. या सर्व चित्रांचे एक सुरेख म्युझियम करण्याचा श्री. हांडे यांचा मनोदय आहे. श्री. भास्कर हांडे यांनी अनेकविध विषयांवर लेखन केले आहे. कविता संग्रहासोबतच ‘३२५ वर्षे देहू – आळंदी – पंढरपूर पालखी सोहळा, काळे तत्व, रंगरूप अभंगाचे या पुस्तकांचा समावेश आहे. त्यांचे ‘रंगरूप अभंगाचे’ या पुस्तकास २०१९ सालातील भारतीय मराठी प्रकाशक संघाचा ‘प्रथम पुरस्कार’ मिळाला आहे. Encounter/Ontmoeting, Subjective sculptures, Liberal Pursuits English, Your Form is my creation या इंग्रजी आणि डच भाषांतील पुस्तकांचेही लेखन त्यांनी केले आहे. १९७८ पासून आजपर्यंत ७५ एकल आणि १२५ सामुहिक चित्र प्रदर्शनांमधून त्यांनी सहभाग घेतला आहे. आंतरराष्ट्रीय बिनाले आणि त्रिनाले प्रदर्शनात १९९० पासून सहभाग घेतला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातील सहभाबरोबरच भारतासह हाॅलंड, ब्रिटन, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, डेन्मार्क, इटली इत्यादी देशांमध्ये नियमितपणे प्रदर्शने भरवली आहेत. विविध देशांमधील चित्र प्रदर्शनात भास्कर हांडे यांच्या चित्रांना आतापर्यंत नऊ बक्षिसे मिळाली आहेत.
महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये सहभाग घेऊन भाषा, संस्कृती आणि संत साहित्यावर ‘चित्रमयता’ या विषयांवर वेगवेगळ्या संस्थांमध्ये व्याख्याने दिली आहेत. महाराष्ट्राच्या मातीचा गंध जगाच्या पाठीवर नेणारा हा कलावंत पठडीबाहेरचाच आहे. विश्वाच्या कल्याणाचं पसायदान मागणारे संत विचार हा चित्रकार आपल्या कलेतून जगभर पोहचवतोयं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तीचित्रांचे संशोधनही श्री. भास्कर हांडे करत आहेत. भास्कर हांडे यांचे चित्र बघणे आणि सोबतचा अभंग वाचून त्यामागची निर्मितीप्रक्रिया त्यांच्याच शब्दांत वाचणे हा एक निखळ अनुभव आहे. यासाठी तरी एकदा औंध, पुणे येथील ‘वैश्विक कला पर्यावरण’ ला अवश्य भेट दिली पाहिजे. आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त झाली तरी श्री. भास्कर हांडे हा चित्रकार आपल्या गावाला विसरलेला नाही. हरवलेला गाव पुन्हा शोधूनही सापडणार नाही याचं भान या कवीला आहे म्हणूनच भविष्यातील गाव अतिव सुंदर असावा या भावनेतून या आंतरराष्ट्रीय किर्तीच्या चित्रकाराने उंब्रज गावातील धर्मशाळेचा जिर्णोद्धार करून ती गावाला सुपूर्द केली आहे. अशा या संवेदनशील कवी आणि चित्रकाराची कामगिरी सर्व जुन्नरकरांसाठी अभिमानास्पद आणि गौरवास्पद बाब आहे.
लेखक: श्री. संजय वसंतराव नलावडे (धोलवड, मुंबई)