अनंत चतुर्दशीदिनी मोठ्या प्रमाणात होणा-या श्रीविसर्जनासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज
कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत नागरिकांनी यावर्षीचा श्रीगणेशोत्सव उत्साहात व निर्विघ्नपणे पार पाडण्यात महत्वाची भूमिका बजावलेली आहे. दीड, पाच व सात दिवसाच्या विसर्जनप्रसंगीही नागरिकांनी पर्यावरणपूरक दृष्टीकोनातून कृत्रिम विसर्जन स्थळांना पसंती देत मोजक्याच संख्येने विसर्जनस्थळी येऊन कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन केल्याचे चित्र दिसून आले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोव्हीड 19 च्या प्रसाराला प्रतिबंध व्हावा याकरिता विसर्जनस्थळी होणारी गर्दी टाळण्यासाठी आठही विभागांमध्ये नागरिकांना सोयीचे ठरेल अशा 151 ठिकाणी कृत्रिम विसर्जन स्थळांची निर्मिती करण्यात आली. त्याला नागरिकांचा सर्वच विसर्जनदिनी उत्तम प्रतिसाद मिळाला. 3 विसर्जनदिवशी एकूण 18286 श्रीमूर्तींचे शांततेत विसर्जन पार पडले.
आता रविवार दि. 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीदिनी सार्वजनिक श्रीगणेशोत्सवासह घरगुती श्रीमूर्तींचे मोठ्या प्रमाणावर विसर्जन होणार असल्याने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सर्व यंत्रणा अधिक सुनियोजितपणे कार्यान्वित ठेवण्याचे आदेशित केलेले आहे. त्यानुसार महापालिका क्षेत्रातील 22 मुख्य विसर्जन स्थळांवर संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून एक हजाराहून अधिक स्वयंसेवक, लाईफगार्ड्स यांची व्यवस्था अधिक कृतिशीलपणे कार्यरत असणार आहे. त्यासोबतच अग्निशमन दलाचे जवानही कार्यरत असणार आहेत. पोलीस यंत्रणेचेही विसर्जन स्थळांवर तसेच विसर्जन मार्गावर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने बारकाईने लक्ष असणार आहे. सर्व मुख्य विसर्जन स्थळांवर नागरिकांच्या सुरक्षा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सी.सी.टी.व्ही. यंत्रणा लावण्यात आलेलेी आहे.
विसर्जनस्थळांवर विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली असून पिण्याच्या पाण्यासह प्रथमोपचार वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. श्रीमुर्तींसोबत विसर्जनस्थळी येणा-या पुष्पमाळा, फुले, दुर्वा, तुळस, शमी, फळांच्या साली-तुकडे यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोगे ‘ओले निर्माल्य’ तसेच मुर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान असे ‘सुके निर्माल्य’ ठेवण्यासाठी सर्व विसर्जन स्थळांवर स्वतंत्र निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच निर्माल्याचे पावित्र्य जपत ते वाहून नेण्यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
शासन निर्देशानुसार कोव्हीड 19 च्या प्रसार प्रतिबंधासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारे मिरवणूका काढण्यात येणार नसल्याने वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दरवर्षीप्रमाणे मंच उभारून श्रीगणेशमूर्तींवर करण्यात येणारी पुष्पवृष्टी यावर्षीही करण्यात येणार नाही. संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून विसर्जनस्थळांवर श्रीगणेशभक्तांचे स्वागत तसेच विसर्जनाच्या दृष्टीने मौलिक सूचना देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
शाडूच्या श्रीमूर्तींचे विसर्जन नागरिकांनी शक्यतो घरच्या घरी करावे अथवा मोजक्या कुटुंबियांसमवेत महानगरपालिकेने निर्माण केलेल्या 151 कृत्रिम विसर्जन तलावांपैकी आपल्या घराजवळील कृत्रिम तलावात करून नैसर्गिक जलस्त्रोतांचे पर्यावरणशील दृष्टीकोन जपत रक्षण करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.
याशिवाय विसर्जनस्थळी गर्दी टाळली जावी आणि भाविकांना त्यांच्या सोयीच्या वेळी व स्थळी सुलभपणे शांततेत श्रीमूर्ती विसर्जन करता यावे याकरिता कार्यान्वित करण्यात आलेल्या nmmc.visarjanslots.com या ‘ऑनलाईन श्रीगणेशमूर्ती विसर्जन स्थळ नोंदणी’ विशेष पोर्टलला भेट देऊन आपल्या विसर्जन स्लॉटचे बुकींग करावे असेही आवाहन करण्यात येत आहे. या गणेशोत्सवात 1200 हून अधिक नागरिकांनी आपले ऑनलाईन विसर्जन स्लॉट बुकींग केले आहेत.
दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही सुजाण नवी मुंबईकरांनी कोव्हीड 19 चे सुरक्षा नियम पाळून दिलेल्या सहकार्यामुळेच श्रीगणेशोत्सवातील आत्तापर्यंतचे श्रीमूर्ती विसर्जन निर्विघ्नपणे पार पडले असून अनंतचतुर्दशीदिनी होणा-या विसर्जन सोहळ्याकरिता महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांचेमार्फत सर्वोतोपरी दक्षता घेण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी गर्दी टाळून तसेच मास्कचा वापर, सुरक्षित अंतर असे आरोग्यभान ठेवून संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.