“इंडियन स्वच्छता लीग” अंतर्गत 17 सप्टेंबरचा स्थगीत कार्यक्रम 22 सप्टेंबरला
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
“युथ वर्सेस गार्बेज” लढाईसाठी सीबीडी बेलापूर येथील राजीव गांधी स्टेडियममध्ये नवी मुंबईकर युवक सज्जशहरात तिरंगी मानवी साखळीसह विविध 4 ठिकाणी स्वच्छता उपक्रम – तृतीयपंथीयांचाही सहभाग
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना देशामध्ये स्वच्छतेचे महत्व प्रसारित व्हावे यादृष्टीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार “स्वच्छ अमृत महोत्सव” आयोजित केला जात आहे. यामध्ये “इंडियन स्वच्छता लीग” हा अभिनव उपक्रम राबविला जात असून देशातील 1800 हून अधिक शहरांमध्ये स्वच्छता विषयक नानाविध उपक्रम राबविले जात आहेत.
10 ते 40 लाख लोकसंख्येच्या मोठ्या शहरात “स्वच्छ सर्वेक्षण 2021” मध्ये देशातील प्रथम क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान नवी मुंबई महानगरपालिकेने मिळविलेला असून स्वच्छतेमधील मानांकन उंचाविण्यासाठी लोकसहभागातून सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत.
या अनुषंगाने “इंडियन स्वच्छता लीग”मध्येही नवी मुंबई शहर उत्साहाने सहभागी झाले असून “यूथ वर्सेस गार्बेज” ही या अभियानाची टॅगलाईन लक्षात घेत शहरातील युवाशक्तीला एकत्र आणून स्वच्छतेचा संदेश व्यापक स्वरुपात प्रसारित केला जात आहे. या लीगकरीता “नवी मुंबई इको क्नाईट्स” हा नवी मुंबईकरांचा संघ स्थापित करण्यात आला असून नवी मुंबईचे नागरिक असणारे जगप्रसिध्द संगीतकार, गायक पद्मश्री श्री. शंकर महादेवन हे या संघाचे कर्णधारपद भूषवित आहेत.
“इंडियन स्वच्छता लीग” अंतर्गत यापूर्वी 17 सप्टेंबर रोजी नियोजित असलेला विशेष कार्यक्रम अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर स्थगीत करण्यात आला होता. हा विद्यार्थी व युवकांच्या सहभागाने मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जाणारा विशेष स्वच्छता कार्यक्रम आता गुरुवार दिनांक 22 सप्टेंबर 2022 रोजी, सकाळी 8 वाजता, सेक्टर 3 सीबीडी बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात पद्मश्री श्री. शंकर महादेवन यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न होणार असून यामध्ये विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच शहरातील इतर युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
यामध्ये सहभागी शाळा, महाविद्यालये यांच्यामार्फत कच-याचे निर्माण होतो त्याच ठिकाणी 3 प्रकारे वर्गीकरण, सिंगल यूज प्लास्टिकला प्रतिबंध आणि स्वच्छता विषयक इतर बाबी अशा 3 विषयांवर सादरीकरण केले जाणार आहे. वेषभूषा, घोषवाक्ये अथवा इतर वेगळ्या कल्पना राबवून स्वच्छता विषयक सादरीकरण करणा-या सर्वोत्कृष्ट 3 शाळा, महाविद्यालयांना “mygov” पोर्टलवर जास्तीत जास्त नोंदणी, सर्वोत्कृष्ट सादरीकरण व शिस्त या निकषांच्या आधारे पारितोषिके देऊन सन्मानित केले जाणार आहे.
अशाच प्रकारे आणखी एक *आगळावेगळा उपक्रम पामबीच मार्गावर राबविला जात असून महिला बचत गट, महिला संस्था तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्रीसदस्य व विविध स्वयंसेवी संस्था यांच्या एकत्रित सहभागातून स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून 7500 मीटर अंतराची तिरंगी मानवी साखळी महापालिका मुख्यालयासमोरील चौक ते मोराज सर्कल, सानपाडा पर्यंत साकारली जाणार आहे. त्याचप्रमाणे याठिकाणी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्रीसदस्य व स्वयंसेवी संस्था प्रतिनिदी कांदळवन परिसराची स्वच्छता मोहीम राबविणार आहेत.
त्याचप्रमाणे सेक्टर 10 ए, वाशी याठिकाणी नवी मुंबईतील तृतीयपंथी नागरिक एकत्र येऊन तेथील परिसराची स्वच्छता करीत “स्वच्छता कार्यात आमचाही सहभाग” म्हणून नवी मुंबई शहराच्या स्वच्छतेत सक्रिय योगदान देणार आहेत.
पारसिक हिल, सीबीडी बेलापूर येथील जलकुंभाच्या परिसरात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्रीसदस्य एकत्र येऊन ओला, सुका व घरगुती घातक कच-याच्या वर्गीकरणाचे महत्व हिरव्या, निळ्या व काळ्या रंगप्रदर्शनातून प्रसारित करणार असून तेथील परिसराची स्वच्छता करणार आहेत.
नवी मुंबईतील विविध घटकांना सामावून घेत “इंडियन स्वच्छता लीग” अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात असून “युथ वर्सेस गार्बेज” या संकल्पनेनुसार 22 सप्टेंबर रोजी सीबीडी बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात तरूणाईच्या सहभागातून स्वच्छतेचा जागर केला जाणार आहे. तरी या कार्यक्रमामध्ये नवी मुंबईतील तरूणाईने तसेच इतरही ठिकाणच्या स्वच्छता विषयक उपक्रमांमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन आपल्या नवी मुंबई शहराला स्वच्छतेत नंबर वन आणण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.