कोव्हीडच्या तिस-या लाटेत मुलांमधील प्रादुर्भाव रोखण्यासाठी खाजगी डॉक्टरांची भूमिका महत्वाची:
– कोव्हीड तिस-या लाटेत मुलांमधील प्रादुर्भाव रोखण्यासाठी खाजगी डॉक्टरांची भूमिका महत्वाची
– विशेष वेबसंवादात बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय येवले यांचे मार्गदर्शन
कोणत्याही व्यक्तीस बरे वाटेत नाही म्हटल्यावर तो पहिल्यांदा त्याच्या जवळच्या फॅमिली डॉक्टरकडे धाव घेतो. त्यामुळे खाजगी डॉक्टरची भूमिका अत्यंत महत्वाची असून कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेत कोरोनाबाधीतांमध्ये मुलांची संख्या अधिक असेल असे अनुमान आहे. त्यामुळे खाजगी डॉक्टरांची जबाबदारी अधिक वाढणार असून त्यांच्यामार्फत योग्य माहिती पालकांपर्यंत पोहचली व पालकांना मानसिक आधार देण्याचे काम झाले तर पुढील संभाव्य धोके टळतील यादृष्टीने सर्व खाजगी डॉक्टरांनी पुढाकार घेऊन काम करावे असे आवाहन नामांकित बालरोगतज्ज्ञ तथा महाराष्ट्र शासनाच्या कोव्हीड पेडियाट्रिक टास्क फोर्सचे सन्माननीय सदस्य डॉ. विजय येवले यांनी केले. कोव्हीडच्या तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेल्या महापालिका क्षेत्रातील खाजगी डॉक्टरांच्या वेबिनारप्रसंगी त्यांनी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या उपस्थितीत 302 डॉक्टरांशी पेडीयाट्रिक प्रोटोकॉल संबंधीत माहितीप्रद सुसंवाद साधला. यामध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे सहभागी होत्या.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.श्री.उध्दव ठाकरे यांनी मांडलेली “माझा डॉक्टर” ही संकल्पना आपल्या फॅमिली डॉक्टरांबद्दलचा नागरिकांच्या मनात असणारा विश्वास अधोरेखीत करणारी असून त्यादृष्टीने खाजगी डॉक्टरांनी कोव्हीड ट्रिटमेंटमध्ये उशीर होणार नाही याची दक्षता घ्यावी असे याप्रसंगी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सूचित केले. लक्षणे न जाणवणा-या कोरोनाबाधीत मुलांना गृह विलगीकरणात ठेवायचे असल्यास बालरोगतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊनच गृह विलगीकरणात ठेवावे व त्याच्या प्रकृतीकडे दररोज नियमित लक्ष ठेवावे असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय येवले यांनी मार्गदर्शन करताना खाजगी डॉक्टरांकडे तपासणीसाठी आलेल्या लहान मुलांमध्ये कोव्हीड सदृष्य लक्षणे जाणवल्यास त्यांची त्वरीत कोव्हीड टेस्ट करून घेण्यासाठी पालकांची मनोभूमिका तयार करावी. दुस-या लाटेमध्ये तपासणीतील उशीर हे रुग्ण गंभीर होण्याचे सर्वात मोठे कारण होते, त्यामुळे याबाबत दक्षता घ्यावी. नवी मुंबई महानगरपालिकेने 23 नागरी आरोग्य केंद्रे, 4 रुग्णालये तसेच विविध शिबिरांमध्ये कोव्हीड टेस्टींगची मोठ्या प्रमाणावर सुविधा निर्माण केली असून त्याठिकाणी विनामूल्य टेस्टींग केली जात आहे त्याचा लाभ घेण्याबाबत पालकांना सूचित करण्यात यावे असे डॉ. विजय येवले यांनी सांगितले.
घरामधील एखाद्या व्यक्तीस कोव्हीड झाला असल्यास त्याच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींची कोव्हीड टेस्ट करताना त्यामधून लक्षणे जाणवत नाहीत म्हणून शक्यतो मुलांची कोव्हीड टेस्ट केली जात नाही. तथापि सध्या मुलांमध्ये कोव्हीड बरा झाल्यानंतर होणा-या एमआयएस – सी आजाराची लक्षणे आढळत असून त्यामागील कारणांचा शोध घेतला असता अनेकदा मुलांना कोव्हीड होऊन गेला असल्याचे आढळत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने एमआयएस – सी नोटिफाइड सिंड्रोम म्हणून जाहीर करून त्याबाबत विशेष काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. सलग 2 ते 3 दिवस जास्त प्रमाणात ताप, उलट्या, जुलाब, डोळे लाल होणे, ओठ – जीभ – घसा लाल होणे अशी एम.आय.एस.-सी ची लक्षणे असून अशी लक्षणे मुलांमध्ये आढळल्यास मागील किमान तीन महिन्यांतील त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य स्थिती जाणून घेऊन पालकांना मुलांची बालरोगतज्ज्ञांकडून त्वरीत तपासणी करून घेण्याचे सूचित करावे असे खाजगी डॉक्टरांना या वेबिनारमध्ये सांगण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने एमआयएस – सी आजाराबाबतची माहिती पत्रके तयार करण्यात आली असून ती महापालिका क्षेत्रातील सर्व खाजगी डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये ठेवण्यात येतील. त्याचे वितरण आपल्या क्लिनिकमध्ये येणा-या प्रत्येक व्यक्तीला करावे जेणेकरून याबाबतच्या माहितीचे जास्तीत जास्त प्रसारण होईल असेही डॉक्टरांना सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे अंगणवाडी वर्कर, आशा वर्कर यांच्यामार्फतही जनजागृती करण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती देण्यात आली. लहान मुलांची प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी नियमित केले जाणारे लसीकरण करून घ्यावे असेही डॉ. विजय येवले यांच्यामार्फत सूचित करण्यात आले.
कोव्हीडच्या तिस-या लाटेत मुले प्रभावीत होतील याची शक्यता लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिका संपूर्ण दक्षता घेत असून त्यादृष्टीने बालरोगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सुविधांमध्ये वाढ करीत आहे अशी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी माहिती दिली. नवी मुंबई महानगरपालिकेची कोव्हीड यंत्रणा अत्यंत सक्षम असून आता कोव्हीड बाधीतांची दैनंदिन संख्या कमी होत असली तरी टेस्टींग मात्र तेव्हढ्याच प्रमाणात केले जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची स्वत:च्या अत्याधुनिक आरटीपीसीआर लॅबची क्षमताही महिन्याभरात दैनंदिन 2 हजार टेस्टहून 5 हजार टेस्ट इतकी वाढविण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हीड सदृष्य लक्षणे जाणवल्यास टेस्ट करून घेण्याचा आग्रह धरावा असेही आयुक्तांनी खाजगी डॉक्टरांना सूचित केले.
नागरिकांचा अधिक विश्वास असलेल्या खाजगी डॉक्टरांची भूमिका अत्यंत महत्वाची असून त्यादृष्टीने जागरूकता निर्माण करण्यासाठी या विशेष वेबिनारचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सर्व डॉक्टरांकडून सकारात्मक प्रतिसाद लाभेल असा विश्वास व्यक्त केला.