पावसाळ्यात रस्त्यावर खड्डा दिसल्यास संबंधित अधिका-यांवर होणार कारवाई
पावसाळी कालावधीत रस्ते सुस्थितीत असणे हे सर्वात महत्वाचे असून रस्त्यांवर एकही खड्डा असता कामा नये याकरिता आत्तापासूनच सतर्क राहून आपापल्या विभागातील मोठ्या व लहान अशा सर्व रस्त्यांची काटेकोर पाहणी करावी व त्वरीत रस्ते दुरुस्ती करावी असे निर्देशित करतानाच महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी कोणत्याही परिस्थितीत पावसाळी कालावधीत खड्ड्यांमुळे लोकांची गैरसोय होता कामा नये व खड्ड्याची तक्रार येता कामा नये याची दक्षता घेण्याचे आदेश दिले. याविषयी निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिका-यांवर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.
पावसाळी पूर्व कामांचा विस्तृत आढावा घेण्यासाठी आयोजित विशेष बैठकीत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी परिमंडळ 1 चे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, शहर अभियंता श्री. संजय देसाई यांच्याकडून पावसाळापूर्व कामांची सविस्तर माहिती घेतली आणि रस्ते खोदाईशी संबंधीत कोणतीही कामे 15 मे पर्यंत पूर्ण करावीत व 31 मे पर्यंत डागडुजी करून रस्ते पूर्ववत करावेत तसेच नाले व गटारे सफाई 25 मे पर्यंत पूर्ण करावी असे निर्देश दिले.
पावसाळी कालावधीत कोणतीही दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल अशी स्पष्ट समज देत आयुक्तांनी कोणतीही घटना घडल्यावर त्यावर उपाययोजना करण्यापेक्षा त्या आधीच दुर्घटना घडू नयेत म्हणून सतर्कतेने आवश्यक ती दक्षता घ्यावी असे निर्देश अभियांत्रिकी आणि स्वच्छता विभागास दिले. .
नवी मुंबई शहरातील काही भाग समुद्र पातळीपासून खाली असल्यामुळे मोठी भरती असताना अतिवृष्टी झाल्यास शहराच्या काही भागात पाणी साचते हे लक्षात घेऊन त्याठिकाणी आवश्यक क्षमतेचे पाणी उपसा पंप पुरेशा संख्येने उपलब्ध करून ठेवावेत असे आयुक्तांनी सूचित केले. त्याचप्रमाणे होल्डींग पॉँडवरील फ्लॅप गेटची दुरुस्ती, पंपींग स्टेशनमधील आवश्यक बाबींची पुर्तता, अतिरिक्त पंप व्यवस्था, तेथील विद्युत पुरवठ्यासाठीची पर्यायी व्यवस्था, अंडरपासमध्ये पाणी साठण्याच्या संभाव्य ठिकाणी पंप व्यवस्था, धोकादायक विद्युत खांबे आधीच काढून टाकण्याची कार्यवाही, महानगरपालिकेच्या इमारतींची आवश्यक दुरुस्ती, मोरबे धरण प्रकल्पस्थळी पावसाळ्याच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही अशी विविध बाबींकडे बारकाईने लक्ष देत आवश्यक कार्यवाही 25 मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
पावसाळी कालावधीत पाणी नमुने नियमितपणे तपासले जातील याची दक्षता घेण्यासोबतच ज्याठिकाणी टॅंकरने पाणी पुरविले जाते अथवा इतर स्त्रोतातून पाणी वापरले जाते अशाही ठिकाणच्या पाण्याचे नमुने पावसाळी कालावधी लक्षात घेता नियमितपणे तपासावेत असे निर्देश आयुक्तांनी दिले.
शहरातील सर्व नैसर्गिक खुल्या नाल्यांच्या सफाईचे काम 25 मे पर्यंत पूर्ण करावे असे निर्देशित करतानाच नाल्याच्या प्रवाहात लावलेल्या जाळ्या पावसाळी कालावधीत काढून ठेवल्या जातील याकडे बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. बंदिस्त गटारे सफाईदेखील 25 मे पर्यंत पूर्ण करावी व सफाई करताना काढण्यात आलेला गाळ जरा सुकल्यानंतर 24 तासात उचलून घेण्याची दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले.
सुरु असलेली पावसाळीपूर्व कामे विहित वेळेत पूर्ण होतील याकडे काटेकोर लक्ष द्यावे असे निर्देशित करतानाच झालेल्या कामांचा आढावा पुन्हा एकवार घेणार असल्याचे सूचित करीत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी काही भागांतील कामाची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचेही स्पष्ट केले.