नवी मुंबई

‘कोव्हीड सेंटरमध्ये ग्रंथालय’

– वाशीतील सिडको कोव्हिड सेंटरमध्ये कोरोनाचा तणाव दूर करणारे पुस्तकांचे विश्व ग्रंथालयाव्दारे खुले

– ‘कोव्हीड सेंटरमध्ये ग्रंथालय’ अशा प्रकारचा पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम

कोरोनाबाधितांचा कोव्हिड सेंटरमधील कालावधी तणावरहित जावा व त्यांना सकारात्मक जीवनाची अधिक ऊर्जा मिळावी याकरिता सिडको एक्झिबिशन कोव्हीड सेंटरमध्ये विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून देत त्यांच्याकरिता पुस्तकांचे अनोखे विश्व खुले करून देण्यात आलेले आहे. अशाप्रकारे कोव्हीड सेंटरमधील कोरोनाबाधितांना पुस्तकांच्या स्वरूपात मानसिक बळ देणारा ‘कोव्हीड सेंटरमध्ये ग्रंथालय’ हा बहुधा पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम असावा.

नवी मुंबई महानगरपालिका आणि लेट्स रीड फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोव्हीड सेंटरमध्ये ग्रंथालय’ हा आगळावेगळा उपक्रम सुरू करण्यात आलेला असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी यांनी आज याठिकाणी भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत उपआयुक्त श्री. योगेश कडुस्कर, सेंटरचे नोडल अधिकारी श्री. निलेश नलावडे, सेंटरचे नियंत्रक डॉ. वसंत माने व डॉ. लोहार तसेच या अभिनव उपक्रमाची संकल्पना राबविणारे लेट्स रीड फाऊंडेशनचे श्री. वानखेडे उपस्थित होते.

कोव्हीड पॉझिटिव्ह रूग्ण विलगीकरणासाठी कोव्हीड सेंटरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्याकडे बराच वेळ असतो. अशा कुटुंबापासून दूर एकटेच असलेल्या वेळेत आजाराविषयी तोच तोच विचार करून रूग्णाचे मनोबल कमी होण्याचा संभव असतो. अशावेळी त्याला माहिती, मनोरंजनपर विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून दिल्यास तो त्या विचारांपासून काही प्रमाणात दूर जाऊन पुस्तकांच्या जगात रमू शकतो. याव्दारे त्याच्या मनामध्ये सकारात्मक विचार निर्माण होऊन त्याची उमेद वाढू शकते. याच विचारांतून ‘लेट्स रीड फाऊंडेशन’ या समर्पित भावनेने व्यापक वाचक चळवळ राबविणा-या संस्थेच्या संकल्पनेतून नवी मुंबई महानगरपालिकेच्या सिडको एक्झिबिशन कोव्हीड सेंटरमध्ये हा अतिशय वेगळ्या स्वरूपाचा उपक्रम राबविण्यात आलेला आहे.

याठिकाणी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील उत्तम ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्यात आलेली असून पुस्तकांच्या निवडीवर खूप मेहनत घेण्यात आलेली आहे. हलकीफुलकी मनोरंजक पुस्तके तसेच प्रेरणा देणारी चरित्रे, सकारात्मक विचार देणारे ग्रंथ अशा विविध आशयाची व नामवंत लेखकांची पुस्तके याठिकाणी असून आयुक्तांनी याबाबत संस्थेचे प्रतिनिधी श्री. सचिन जाधव यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली व पुस्तकांच्या निवडीचे कौतुकही केले. तेथील रूग्णांशी संवाद साधताना काही रूग्ण स्वत:सोबत घरून वाचण्यासाठी पुस्तके घेऊन आल्याचेही आढळले त्यांच्याशीही आयुक्तांनी चर्चा केली. एकंदरीत या अभिनव संकल्पनेचे तेथील कोरोना बाधितांनी आनंदाने स्वागत व प्रशंसा केल्याचे दिसून आले.

ही पुस्तके ठेवण्यासाठीचे शेल्फही अत्यंत आकर्षक असून एखादे झाड असावे व त्याला पानांऐवजी पुस्तके असावीत अशी रचना असणा-या शेल्फला आयुक्तांनी पुस्तकाचे झाड असे संबोधत शेल्फची रचना पाहून एखादा न वाचणाराही उत्सुकतेने त्या शेल्फजवळ येऊन पुस्तक हातात घेईल अशा शब्दात त्यांनी शेल्फच्या डिझाईनचे कौतुक केले.

कोव्हिड सेंटरमध्ये दाखल असण्याच्या कालावधीत लागलेली पुस्तक वाचनाची आवड काहीजण घरी गेल्यानंतरही आवडीने जोपासतील व त्यातून एक व्यापक वाचक चळवळ उभी राहील असा विश्वास व्यक्त करीत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी ही अभिनव संकल्पना राबविण्यासाठी पुढाकार घेणा-या लेट्स रीड फाऊंडेशच्या वाचनसंस्कृती वाढीसाठी ते करीत असलेल्या कामाची प्रशंसा करीत शुभेच्छा दिल्या. सिडको एक्झिबिशन कोव्हीड सेंटर प्रमाणेच महानगरपालिकेच्या इतरही कोव्हीड सेंटरमध्येही असा उपक्रम आगमी काळात सुरू केला जाईल असे आयुक्तांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button