एका दिवसात 100 केंद्रांवर 34112 नागरिकांचे आजवरचे विक्रमी लसीकरण, 18 ते 44 वयोगटातील 33602 नागरिकांनी घेतला कोव्हीड लसीचा पहिला डोस
कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष लक्ष दिले जात असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार लसींच्या उपलब्धतेनुसार लसीकरणाचे नियोजन केले जात आहे.
याकरिता लसीकरण केंद्रांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आलेली आहे. आज मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध झाल्याने महानगरपालिकेची 4 रूग्णालये, 22 नागरी आरोग्य केंद्रे तसेच विष्णुदास भावे नाट्यगृह येथे जम्बो सेंटरसह इतर विभागांतील शाळा, समाजमंदिरे अशा एकूण 100 लसीकरण केंद्रांचे नियोजन करण्यात आले होते.
सर्वच ठिकाणी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळाला. 18 ते 44 वयोगटातील 33 हजार 602 नागरिकांनी पहिला डोस तसेच 268 नागरिकांनी दुसरा डोस घेतला. त्याचप्रमाणे 45 ते 60 वर्षावरील 88 नागरिकांनी पहिला तसेच 103 नागरिकांनी दुसरा डोस घेतला. तसेच 60 वर्षावरील 22 नागरिकांनी पहिला व 29 नागरिकांनी दुसरा डोस घेतला. अशाप्रकारे एकूण 33713 नागरिकांनी पहिला व 400 नागरिकांनी दुसरा डोस घेतला.
याशिवाय खाजगी रूग्णालयातील लसीकरण केंद्रांवरही 1019 नागरिकांनी पहिला व 2955 नागरिकांनी दुसरा डोस घेतला. आजच्या दिवसात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात नवी मुंबई महानगरपालिकेची 100 केंद्रे व खाजगी रूग्णालयातील केंद्रे मिळून 38086 इतके लसीकरण झाले.