नवी मुंबईतील शाळांमध्ये शासकीय सूचनांचे पालन करुन 4 ऑक्टोबर पासून 8 वी ते 12 वी वर्ग सुरु होणार
दिनांक 07 जुलै, 2021 व दिनांक 10 ऑगस्ट, 2021 रोजीच्या शासन परिपत्रकांन्वये राज्यातील शाळा/विद्यालयातील वर्ग सुरू करणेबाबत शासनाकडून यापूर्वीच मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या.
दिनांक 24 सप्टेंबर, 2021 च्या शासन परिपत्रकान्वये राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 12 वी व शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12 वी च्या शाळांचे वर्ग दिनांक 04 ऑक्टोबर 2021 पासून सुरक्षितपणे सुरू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.
त्यास अनुसरुन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील इयत्ता 8 वी ते 12 वी च्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळा व विद्यालये दिनांक 04 ऑक्टोबर 2021 पासून सुरक्षितपणे सुरू करणेबाबतचे आदेश निर्गमित केले आहे. त्यामध्ये शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यासंदर्भात शासन परिपत्रकामध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत.
तसेच महानगरपालिकेच्या आठही विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी यांना त्यांच्या क्षेत्रासाठी ‘शाळा तपासणी अधिकारी’ म्हणून प्राधिकृत करण्यात आलेले आहे. त्यांनी आपल्या क्षेत्रातील सर्व शाळांची तपासणी करून शासनाने दिलेल्या सूचनांचे शाळा व्यवस्थापन पालन करते किंवा नाही याबाबत तपासणी करण्याचे आदेश दिलेले आहेत.
सध्याची कोविड-19 साथरोगाची परिस्थिती लक्षात घेता सर्व पालकांनी आपल्या पाल्याच्या आरोग्याविषयी सर्वोतोपरी काळजी घ्यावी तसेच त्यांना शाळेच्या आवारात सुरक्षितपणे पोहचविण्याची दक्षता घ्यावी त्याचप्रमाणे बऱ्याच कालावधीपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापनाने शाळेमध्ये आनंददायी वातावरण निर्माण करावे तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी सर्वोतोपरी काळजी घेऊन विद्यार्थ्याचे आरोग्य सुदृढ राहील याची काटेकोर दक्षता घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.