महाराष्ट्र

आयसीयू बेड्सवरील रूग्णांच्या आरोग्यस्थितीची माहिती देणा-या कॉल सेंटरचा नातेवाईकांना मानसिक आधार

कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासोबतच सध्या कोरोनाबाधितांची मोठ्या प्रमाणावर वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन आरोग्य सुविधांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ केली जात आहे. सद्यस्थितीत रूग्णांच्या आरोग्य स्थितीचा बारकाईने आढावा घेतला असता त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी झपाट्याने खालावण्याचे प्रमाण अत्यंत वाढलेले दिसून येत आहे.

महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर दररोज संध्याकाळी 7 वाजल्यानंतर 3 ते 4 तास सर्व रूग्णालये, नागरी आरोग्य केंद्रे यांच्या वैद्यकीय अधिका-यांशी वेबसंवादाव्दारे साधत असलेल्या आढावा बैठकीतून ही बाब प्रकर्षाने लक्षात आली आहे. त्यास अनुसरून विशेषत्वाने 50 वर्षावरील कोव्हीड पॉझिटिव्ह व्यक्तीस महापालिकेच्या कोव्हीड केंद्रात अथवा त्याच्या इच्छेनुसार कोव्हीड रूग्णालयात वैद्यकीय निगराणीखाली आणण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

तरीही जे रूग्ण गृह विलगीकरण (Home Isolation) मध्ये राहू इच्छितात, त्यांना वैद्यकीय सल्ला देणा-या व त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरकडून तसे प्रमाणित करून घेण्यात येत आहे व संबंधित नागरी आरोग्य केंद्रामार्फतही त्यांच्या प्रकृतीकडे नियमित दूरध्वनी संवादाव्दारे लक्ष ठेवले जात आहे. अशा गृह विलगीकरणातील रूग्णांना 94 खाली ऑक्सिजनची पातळी येणे ही प्रकृतीच्या दृष्टीने धोक्याची घंटा असल्याची स्पष्ट कल्पना देण्यात येत असून तसे आढळल्यास त्यांनी त्वरित महानगरपालिकेच्या कोव्हीड केंद्रात अथवा खाजगी रूग्णालयात दाखल व्हावे अशा स्पष्ट सूचना त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना देण्यात येत आहेत.

कोव्हीड केअर सेंटरमध्ये कोणतीही लक्षणे न दिसणा-या व सौम्य लक्षणे असणा-या कोव्हीड पॉझिटिव्ह व्यक्तींना दाखल केले जात असून त्यांना आपल्या मोबाईलव्दारे त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याची सुविधा आहे. महानगरपालिकेच्या सिडको एक्झिबिशन सेंटर येथील डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटरमध्येही रूग्णांची आरोग्यस्थिती कुटुंबियांना कळविण्यासाठी कॉ़ल सेंटर कार्यन्वित आहे.

तथापि जे रूग्ण आयसीयू बेड्सवर उपचार घेत आहेत अथवा व्हेंटिलेटरवर आहेत त्यांच्या कुटुंबियांना आपल्या रूग्णाची आरोग्य स्थिती जाणून घेण्यात अडचण येत होती. या गोष्टीचे महत्व लक्षात घेत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी महानगरपालिकेच्या वतीने आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्सची सुविधा असलेल्या नेरूळच्या डॉ. डि.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये तसेच कामोठे येथील एमजीएम रूग्णालयामध्ये विशेष कक्ष स्थापन केला असून तेथील कॉ़ल सेंटरमधून दररोज रूग्णांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात येत असून त्यांना त्यांच्या रूग्णाच्या विद्यमान आरोग्य स्थितीची माहिती देण्यात येत आहे.

डॉ.डि.वाय.पाटील रूग्णालयातील कॉल सेंटरमधून दररोज 200 हून अधिक रूग्णांच्या नातेवाईकांना दूरध्वनी करून त्यांच्या रूग्णाची आरोग्य स्थिती कळविली जात आहे. याशिवाय कुटुंबियांना आणखी माहिती हवी असल्यास दररोज दुपारी 12.30 ते 1.30 या वेळेत तेथील फ्ल्यू क्लिनीकमध्ये डॉक्टरांचा समुह नातेवाईकांशी संवाद साधण्यासाठी उपलब्ध असतो. अशीच प्रणाली एमजीएम रूग्णालय कामोठे येथेही दुपारी 2 ते 3 या वेळेत राबविली जात आहे.

कोव्हीड पॉझिटिव्ह रूग्णाची प्रत्यक्ष भेट घेणे त्यांच्या कुटुंबियांना कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांमुळे शक्य नसल्याने विशेषत्वाने आयसीयू व व्हेंटिलेटर बेडवर असलेल्या आपल्या रूग्णाच्या प्रकृतीविषयी चिंता व उपचारांविषयी जिज्ञासा दूर करण्याच्या दृष्टीने हे कॉल सेंटर रूग्णांच्या नातेवाईकांना सर्वार्थाने मानसिक दिलासा देणारे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button