महाराष्ट्र

नवी मुंबईत 26 ठिकाणी हिवताप / डेंग्यू विषयक जनजागृती शिबीरांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद

 नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये हिवताप /डेंग्‍यू आजाराचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रात आयोजित जनजागृतीपर विशेष आरोग्य शिबीरांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज 26 ठिकाणी आयोजित शिबिरांना 13533 नागरिकांनी भेट दिली असून 1312 रक्त नमुने घेण्यात आले आहेत.

या शिबिरांच्या ठिकाणी ॲनॉफीलीस व एडीस डासांची उत्पत्तीस्थाने प्रत्यक्षात मॉडलव्दारे दाखवून, तसेच नागरिकांना डासांच्या अळ्या प्रत्यक्ष दाखवून, घराभोवती व घरांतर्गत असणारी संभाव्य डासोत्पत्ती स्थाने दाखविण्यात आली. यामध्ये पाणी साठवून ठेवलेले ड्रम ओढणी, धोतर किंवा साडीच्या कपड्याने बंदिस्त करणे, त्याचप्रमाणे पाणी साठविण्याची भांडी व टाक्या बंदिस्त करणे व आठवड्यातून एक दिवस स्वच्छ करुन कोरड्या ठेवणे, भंगार साहित्य व टायर्स इ. नष्ट करणे, छतावरील प्लास्टीक शीट, ताडपत्री यामध्ये पाणी साचू न देणे, ताप येताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच याप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन करण्यात आले.

 नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राची भौगोलिक रचना लक्षात घेता नागरी वस्तीलगत असणारा खाडी किनारा व त्याठिकाणचा दलदलीचा परिसर यामध्ये हिवाळा कालावधीत क्युलेक्स डासांची घनता वाढण्याकरिता पोषक वातावरण असल्याने या कालावधीत इतर कालावधीपेक्षा जास्त डास प्रादुर्भाव जाणवतो. परिणामी सदर कार्याक्षेत्रालगतच्या नागरी वस्तीमधून डास प्रादुर्भावाच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असतात.

यामुळे दि.25/11/2024 ते 22/2/2025 या कालावधीत नागरिकांना डासांचा जास्त त्रास जाणवू नये या उद्देशाने आयुक्त महोदयांच्या निर्देशानुसार डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सकाळच्या नियमित धुरीकरणासोबत सायंकालीन धुरीकरण सुरु करण्यात आले आहे. 

 सकाळचे धुरीकरण हे साप्ताहिक वेळापत्रानुसार नियोजित कार्यक्षेत्रामधील बंद गटारांमध्ये केले जाते तर सायंकालीन धुरीकरण गावठाण, झोपडपट्टी व सोसायटी अंतर्गत मीटर रुम, जिने या ठिकाणी पंधरवडा कार्यक्रमानुसार राबविले जाते.

 अशाप्रकारची शिबिरे ऑगस्ट पासून सातत्याने राबविण्यात येत असून त्यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभलेला आहे.

अ.क्रदिनांकएकुण शिबीर संख्यालाभ घेतलेले लाभार्थीएकुण घेतलेले रक्त नमुने
103-08-20242480531025
205-08-202424104251466
312-08-20242488211101
420-08-202424128481057
528-08-202424132561216
605-09-202424123031026
825-09-20242410780641
1017-10-20242410221833
1130-10-2024249999635
1207-11-2024249080594
1314-11-2024249369738
1428-11-202426135331312
एकुण29012868811644

अशाप्रकारे  नमुंमपा कार्यक्षेत्रात हिवताप / डेंग्यू आजारांबाबत जनजागृती करण्याकरिता दिनांक 03/08/2024 ते 28/11/2024 या कालावधीत एकूण 290 जाहीर शिबीरांचे आयोजन करण्यात आले असून  या शिबिरांचा लाभ 1,28,688 नागरिकांनी घेतला आहे या शिबिरांमध्ये 11644 रक्त नमुने घेण्यात आले आहेत.

तरी आरोग्य विभागाच्या कार्यवाहीसोबतच नवी मुंबईकर नागरिकांनी आपल्या घरातील व घराभोवतालची डासउत्पत्ती स्थाने नष्ट करणे तसेच आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावे, घरातील डासोत्पत्ती स्थाने नष्ट करावीत, आजुबाजूचा परिसर / टेरेसवरील भंगार नष्ट करावे, जेणेकरुन नवी मुंबईत हिवताप / डेंग्यू आजारांवर आळा घालणे शक्य  होईल, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button