नवी मुंबई

रूग्णालयीन कोव्हीड उपचार विषयक बिलांच्या तक्रार निवारणासाठी विशेष केंद्र पुन्हा कार्यान्वित, नागरिक संपर्कासाठी हेल्पलाईन 022-27567389 आणि व्हॉट्स ॲप 7208490010 जाहीर

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना कोरोना बाधितांसाठी त्यांच्या लक्षणांनुसार उपचारार्थ बेड्स उपलब्ध होण्याकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. त्याकरिता साधे, ऑक्सिजन पुरवठा असलेले तसेच आयसीयू बेड्सची व व्हेटिलेटर्सची वाढ करण्यावर गतीमानतेने भर दिला जात आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी उद्भवू नयेत याकरिता 022-27567460 हा हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

यासोबतच खाजगी रूग्णालयांमध्ये उपचार घेणा-या कोरोना बाधीत रूग्णांकडून शासनाने जाहीर केलेल्या दरांनेच देयके आकारली जावीत याकडेही महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे बारकाईने लक्ष आहे. याकरिता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी कोव्हीड रूग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांकडून आकारण्यात आलेल्या बिलांच्या तक्रारी संदर्भातील मदतीसाठी यापूर्वी स्थापित करण्यात आलेला “कोव्हीड 19 बिल तक्रार निवारण कक्ष (Covid Bill Complaint Centre)” पुन्हा कार्यान्वित करण्यात आला आहे. याकरिता 022-27567389 हा दूरध्वनी क्रमांक तसेच 7208490010 हा व्हॉट्स ॲप क्रमांक नागरिकांच्या सुलभ संपर्कासाठी कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. या तक्रार निवारण कक्षाच्या माध्यमातून गतवर्षी कोव्हीड प्रभावित काळात कोरोना बाधीतांना त्यांच्या रुग्णालयीन देयक रक्कमेत मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला होता. याकरिता कोव्हीड सुरू झाल्यापासूनच्या काळातील सर्व देयकांचे विशेष देयके परीक्षण समुह निर्माण करून लेखा परीक्षणही करण्यात आले होते.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दि. 21 मे 2020 व 30 ऑगस्ट 2020 रोजीच्या अधिसूचनेनुसार कोव्हीड 19 संसर्ग बाधित रूग्णांना वैद्यकीय सेवा देणा-या बॉम्बे नर्सिंग होम (अमेन्डमेंट) ॲक्ट 2006 नुसार नोंदणीकृत ‘हेल्थ केअर प्रोव्हायडर ( विविध रूग्णालये, नर्सिंग होम, डिस्पेंसरीज)’ यांना मार्गदर्शक सूचना पारीत केल्या आहेत व त्यामधील प्रपत्र ‘सी’ मध्ये रूग्णालयीन उपचारांकरिता आकारावयाचे बाबनिहाय दर देखील जाहीर केले आहेत. याविषयी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही साथरोग नियंत्रक सक्षम प्राधिकारी म्हणून महापालिका आयुक्त यांचे स्वाक्षरीने दि. 18 ऑगस्ट 2020 रोजी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व ‘हेल्थ केअर प्रोव्हायडर (विविध रूग्णालये, नर्सिंग होम, डिस्पेंसरीज)’ यांना रूग्णांना देण्यात येणा-या सेवांबाबत मार्गदर्शक सूचनांचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यानुसारच देयके आकारण्यात यावीत असे निर्देश प्रत्येक रूग्णालयामध्ये महानगरपालिकेमार्फत नियुक्त नोडल अधिकारी यांचेमार्फत पुन्हा सर्व रूग्णालय व्यवस्थापनांना देण्यात आलेले आहेत.

तथापि काही रूग्णालयांकडून या आदेशाचे व शासन निर्णयाचे उल्लंघन होऊन रूग्णांच्या देयकात जास्तीचे दर आकारून बिले दिली जात असल्यास कोव्हीड रूग्ण अथवा त्यांचे नातेवाईक या विषयीची तक्रार नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय मधील ‘कोव्हीड बिल तक्रार निवारण कक्ष (Covid Bill Complaint Center)’ याठिकाणी 022-27567389 या हेल्पलाईन क्रमांकावर कार्यालयीन वेळेत करू शकतील. या केंद्रातील कर्मचारी संपर्क साधणा-या व्यक्तीकडून रूग्णाचे नाव, तक्रारदाराचे नाव, मोबाईल व संपर्कध्वनी क्रमांक, रूग्णाचा पूर्ण पत्ता, रूग्णालयाचे नाव व पत्ता, रूग्णालयात दाखल दिनांक, रूग्णालयातून डिस्चार्ज दिनांक, रूग्णालयाने आकारलेल्या बिलाची रक्कम व तक्रारीची संक्षिप्त माहिती विचारतील. त्यानंतर तक्रारदार व्यक्तीस cbcc@nmmconline.com या ई मेल आय डी वर अथवा 7208490010 या व्हॉट्स अॅप क्रमांकावर बिलाच्या प्रती पाठविणेबाबत सूचित केले जाईल. या प्रती प्राप्त झाल्यानंतर तक्रारदारास विशिष्ट टोकन क्रमांक दिला जाईल.

बिलांविषयी प्राप्त झालेल्या तक्रारींवर महानगरपालिकेच्या वतीने योग्य ती कार्यवाही करून त्याविषयीची माहिती तक्रारदाराला देण्यात येईल. याशिवाय तक्रारदार आपल्या टोकन क्रमांकाचा संदर्भ देऊन आपल्या तक्रारीविषयी करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती या कक्षाकडून उपलब्ध करून घेऊ शकेल. तरी नागरिकांनी अशा प्रकारे काही तक्रार असल्यास नवी मुंबई महानगरपालिकेच्या ‘कोव्हीड बिल तक्रार निवारण कक्ष (Covid Bill Complaint Centre)’ येथे 022-27567389 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button