रूग्णालयीन बेड्स व रूग्णवाहिका उपलब्धतेसाठी नवी मुंबईकरांसाठी हेल्पलाईन सुविधा, 27567460 क्रमांकासह इमर्जन्सी 24 X 7 कॉल सेंटर कार्यान्वित
मागील काही दिवसात कोव्हीड बाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असून त्यांच्यावरील उपचाराकरिता आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने युध्दपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे. यादृष्टीने मध्यंतरीच्या काळात कोव्हीडचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेली महानगरपालिकेची कोव्हीड़ सेंटर्स पुन्हा कार्यान्वित केली जात आहेत. त्याकरिता आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीनेही कार्यवाही सुरू आहे.
यामध्ये महत्वाची बाब म्हणजे नागरिकांना रूग्णालयीन बेड्स उपलब्धतेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये व त्यांना लक्षणांच्या तीव्रतेनुसार योग्य प्रकारचे बेड्स व रूग्णवाहिका उपलब्ध व्हाव्यात याकडे विशेष लक्ष देत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मुख्यालयात ’24 X 7 तात्काळ रूग्णालयीन बेड्स व रूग्णवाहिका उपलब्धता कॉल सेंटर (EMERGENCY 24 X 7 HELPLINE FOR HOSPITAL BEDS AND AMBULANCE)’ कार्यान्वित करण्यात आले आहे. यासाठी 022 – 27567460 हा हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आलेला आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रूग्णालय सुविधांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी महानगरपालिकेमार्फत यापूर्वीच https://www.nmmchealthfacilities.com हा फॅसिलिटी पोर्टल डॅशबोर्ड कार्यान्वित करण्यात आला असून हा रूग्णालयीन सुविधांची माहिती देणारा डॅशबोर्ड नियमित अद्ययावत राहील याकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश प्रत्येक कोव्हीड रूग्णालय / महानगरपालिकेची कोव्हीड सेंटर्स याकरिता नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिका-यांना देण्यात आलेले आहेत.
तथापि अनेक नागरिकांकडून प्राप्त अभिप्रायानुसार फॅसिलिटी पोर्टलवर एखाद्या रूग्णालयात बेड्स उपलब्ध असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात फोन केल्यास बेड उपलब्ध नाही असे सांगितले जात आहे. त्यामुळे रूग्ण व रूग्णाच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर रूग्णाने किंवा त्याच्या नातेवाईकाने रूग्णालयात फोन न करता तो कॉल सेंटरला करणे अपेक्षित असून तिथून पुढे कॉल सेंटरच्या माध्यमातून रूग्णालयाशी संपर्क साधणे व बेड उपलब्ध असल्याचे संबंधित रूग्णाच्या नातेवाईकांना सांगणे ही कार्यवाही कॉल सेंटरमधील डॉक्टरांमार्फत करण्यात येईल.
हे इमर्जन्सी कॉल सेंटर दिवसरात्र 24 X 7 सुरू असणार असून नागरिकांनी 022 – 27567460 या क्रमांकावर फोन केल्यास या कॉल सेंटरव्दारे त्याची नोंद घेण्यात येऊन सेंटरमध्ये असलेल्या डॉक्टरांव्दारे रूग्णाच्या लक्षणांची तीव्रता जाणून घेऊन त्यांना योग्य रूग्णालयीन सुविधा उपलब्ध होईपर्यंत पाठपुरावा केला जाणार आहे. त्याचप्रमाणे रूग्णवाहिका उपलब्धतेसाठीही मदत केली जाणार आहे. याशिवाय कॉल सेंटरमार्फत प्लाझमा दान विषयक माहिती व जनजागृती केली जाणार आहे.
सध्याचा दैनंदिन मोठ्या प्रमाणात वाढत असलेला कोरोना बाधितांचा आकडा पाहता रूग्णालयीन सुविधांवर प्रचंड ताण असून कोरोनाची बाधा झाल्यास वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यातील दिवसेंदिवस कठीण होत चाललेली संपूर्ण राज्यातील स्थिती लक्षात घेऊन नवी मुंबईकर नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क परिधान करणे अनिवार्य आहे हे लक्षात घ्यावे आणि सुरक्षित अंतरासह सतत हात धुण्याची सवय लावून घेऊन स्वत:ला व इतरांना कोरोना बाधित होण्यापासून वाचवावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.