हनुमान जयंतीला गर्दी न करण्याचे आवाहन
पनवेल
27 एप्रिल रोजी येत असलेला हनुमान जयंती उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ २ चे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी केले आहे. ग्रामस्थानी कोणत्याही प्रकारची पालखी आणि मिरवणूकीचे आयोजन करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
हनुमान जयंती उत्सव हा अत्यंत गाजावाजा करत व पालखी मिरवणूक काढून दरवर्षी ग्रामीण भागात साजरा केला जातो. तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये हनुमंताचे मंदिर असल्याने हा उत्सव प्रत्येक गावात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी हनुमान जयंती उत्सवाला होत असते. मात्र गेल्या वर्षापासून हनुमान जयंती उत्सवाला कोरोनाचे ग्रहण लागले. व हनुमान जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. याही वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे कोणीही हनुमान जयंती पालखी उत्सव गर्दी होईल आणि शासकीय नियमांचे उल्लंघन होईल अशा प्रकारे साजरी करू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ते कमी करण्यासाठी शासकीय स्तरावर विविध प्रयत्न केले जात आहेत. त्याच अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ 2 मधील 10 पोलीस स्टेशनच्या हददित हनुमान जयंती सोहळ्याला गर्दी करू नये तसेच अत्यंत साधेपणाने हनुमान जयंती उत्सव साजरा करावा व प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मास्क घालून ठराविक लोकानीच फोटोपूजन करा. कोणत्याही प्रकारे पालखी, मिरवणुका काढू नये. शासकीय नियमाचे पालन करा. सोशल डिस्टंसिंगचे पालन करा. आपल्या गावामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची काळजी घ्यावी. ग्रामपंचायत ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, सदस्य यानी गावामध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये याची काळजी घ्यावी. पालखी, मिरवणूका काढत असल्यास त्यांनी पोलीसाना कळवावे. पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असणार आहे. – शिवराज पाटिल, पोलीस उपायुक्त, परिमंडळ 2