गुढीपाडवा
गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू कॅलेंडर प्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, नवीन व्यवसाय आणि उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते.
या दिवशी लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. उंच बांबूच्या काठीला कडूनिंबाची डहाळी, काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून त्यावर तांब्याचे भांडे बसवले जाते, गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो.
गुढीला गंध, फुले, अक्षता वाहतात व निरंजन लावून अगरबत्ती दाखवतात. दुपारी गोड जेवणाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. यादिवशी आनंद साजरा करीत नातेवाईक, मित्र-मंडळी यांना नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात.
आरोग्यदृष्ट्या महत्त्व: चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचा रोग बरे करणे, धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण ह्या कडुनिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते. शरीराला थंडावा देणाऱ्या कडूनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते.