नवी मुंबई

पालकमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नमुंमपाच्या आरटी-पीसीआर लॅब विस्तारीकरणाचे लोकार्पण

आता लॅबमध्ये दिवसाला होणार 5000 आरटी-पीसीआर टेस्ट्स :

कोव्हीडची तिसरी लाट येऊ नये ही आपल्या सर्वांचीच इच्छा असून तथापि सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे हे लक्षात घेत संभाव्य तिस-या लाटेला सामोरे जाण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. त्यादृष्टीने अत्याधुनिक आरटी-पीसीआर टेस्टींग लॅबचे विस्तारीकरण करण्यात आले असून यापुढील काळात दिवसाला 5000 इतक्या मोठ्या प्रमाणावर आरटी-पीसीआर टेस्ट्स केल्या जाणार आहेत ही समाधानकारक बाब असल्याचे महाराष्ट्र राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. कोव्हीडच्या दुस-या लाटेत सर्वच ठिकाणी जाणवलेली आयसीयू बेड्स व व्हेन्टिलेटर्सची कमतरता लक्षात घेऊन नेरुळ व ऐरोली येथील महानगरपालिका रुग्णालयात प्रत्येकी 200 आयसीयू बेड्सची सुविधा निर्माण करण्यात आली असून आता एकूण 800 पर्यंत आयसीयू बेड्स कोव्हीड रुग्णसेवेसाठी उपलब्ध होणार आहेत त्यामुळे महानगरपालिकेची आरोग्य सेवा सक्षम होत असल्याबद्दल मंत्रीमहोदयांनी आनंद व्यक्त केला.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 15 नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात सिमेन्स इंडिया लि. कंपनीच्या सीएआर निधीतून उपलब्ध झालेल्या आरटी- पीसीआर चाचणी व निदान प्रयोगशाळेचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी ठाणे लोकसभा सदस्य खासदार श्री. राजन विचारे, महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे व श्रीम. सुजाता ढोले, शहर अभियंता श्री. संजय देसाई आणि इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मंत्रीमहोदयांनी कोव्हीड आरोग्य सुविधा निर्मितीच्या दृष्टीने रुग्णालयात उभारण्यात आलेल्या आयसीयू कक्षाचीही पाहणी केली.

कोव्हीडचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत जास्त कोव्हीड चाचण्या करण्याकडे नवी मुंबई महानगरपालिकेने सुरुवातीपासूनच बारकाईने लक्ष दिले आहे. या अनुषंगाने नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात स्वत:ची अद्ययावत व संपूर्ण स्वयंचलीत आरटी-पीसीआर चाचणी व निदान प्रयोगशाळा 4 ऑगस्ट 2020 रोजी आयसीएमआर शासकीय परवानगीसह केवळ 11 दिवसात कार्यान्वित करण्यात आली. कोव्हीडच्या पहिल्या व दुस-या लाटेत या लॅबने एकही दिवस सुट्टी न घेता अथक कार्यरत राहून आपली सेवा बजावली. या लॅबमध्ये 30 ऑक्टोबरपर्यंत 6 लाख 36 हजार 73 इतक्या आरटी-पीसीआर चाचण्या नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे 38 कोटी इतक्या खर्चाची बचत झालेली आहे. या लॅबमुळे कोव्हीड चाचण्या जलद करून संसर्गीत रुग्णांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तत्परतेने उपचार सुविधा उपलब्ध करून देणे सोयीचे झाले व त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रात कोव्हीड प्रतिबंध कार्याला बळ मिळाले.

आरोग्य तज्ज्ञ व टास्क फोर्सने कोव्हीडच्या तिस-या लाटेची शक्यता वर्तविलेली असून ती मागील लाटांपेक्षा मोठी असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. त्या अनुषंगाने कोव्हीड रुग्णांची चाचणी करून तात्काळ अहवाल प्राप्त झाल्यास कोव्हीडची साखळी तिथेच खंडीत होण्यास मदत होते हे लक्षात घेऊन महानगरपालिकेने आपल्या विद्यमान लॅबची क्षमता 2000 टेस्टने वाढवून 5000 टेस्ट्स प्रतिदिन करण्याचे नियोजन केले. त्यास सिमेन्स इंडिया लि. या उद्योग समुहाने सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आणि सव्वा दोन कोटी इतका सीएसआर निधी उपलब्ध करून दिला आणि ही नवीन अद्ययावत प्रयोगशाळा उभी राहिली. प्रतिदिन 5000 इतक्या मोठ्या प्रमाणावर आरटी-पीसीआर टेस्ट क्षमता असणारी नवी मुंबई महानगरपालिकेची ही लॅब एमएमआर क्षेत्रातील सर्वाधिक क्षमता असणारी आरटी-पीसीआर लॅब आहे.

याप्रसंगी पालकमंत्री महोदय यांच्या शुभहस्ते विस्तारित लॅबच्या उभारणीसाठी सीएसआर निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सिमेन्स कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक श्री. अर्जुन चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे पहिल्या व दुस-या लाटेत अथक परिश्रम घेतलेल्या नवी मुंबई महानगरपालिका आरटी-पीसीआर लॅबच्या समुहाचा विशेष सन्मान पालकमंत्री महोदयांच्या शुभहस्ते नोडल अधिकारी डॉ. संगीता बनसोडे आणि त्यांच्या सहका-यांनी स्विकारला.

कोव्हीड नंतरच्या काळातही स्वाईन फ्ल्यू, लेप्टोस्पायरसीस, एचआयव्ही ते अगदी कॅन्सर पर्यंतच्या मॉल्युक्युलर टेस्ट्स या लॅबमध्ये होणार असल्याने ही लॅब म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेसाठी कायमस्वरुपी उपलब्धी असल्याचे पालकमंत्री महोदयांनी विशेषत्वाने अधोरेखीत केले. त्याचप्रमाणे कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेसाठी नेरुळ व ऐरोली रुग्णालयात आयसीयू बेड्स व व्हेन्टिलेटर्सच्या मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यात आलेल्या सुविधेव्दारे नवी मुंबईकर नागरिकांना भविष्यात दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी महानगरपालिका सक्षम झाली असल्याचेही मंत्रीमहोदयांनी नमूद केले. रुग्णालयातील स्वच्छता व प्रसन्न वातावरण पाहूनच येथे येणारा रुग्ण बरा होईल अशीही विशेष टिपण्णी त्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button