घणसोली विभागातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालय घणसोली कार्यक्षेत्रातील रबाळे स्टेशन ते गवळी हॉस्पीटल रस्त्यालगत, रबाळे या ठिकाणी विनापरवानगी अनधिकृतपणे आरसीसी जोत्याचे इमारतीचे बांधकाम तसेच तुलसी सोना प्लाझा समोर, शंकर मंदिर रोड, गोठीवली या ठिकाणी विनापरवानगी अनधिकृतपणे तिसऱ्या मजल्यापर्यंत रहिवास वापर असलेल्या इमारतीवर चौथ्या मजल्याचे वाढीव बांधकाम प्रगतीपथावर त्याचप्रमाणे वैष्णोदेवी मंदिरासमोर, समर्थनगर रस्त्यालगत, समर्थनगर, घणसोली येथे विनापरवानगी अनधिकृतपणे आरसीसी जोत्याचे काम प्रगतीपथावर होते.
या बांधकाम धारकांनी नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरू केले होते. सदरील अनधिकृत बांधकामांस घणसोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी या ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते.
या अनधिकृत बांधकामावर घणसोली विभागामार्फत धडक मोहिमेचे आयोजन करण्यात येऊन ही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आलेली आहेत. या धडक मोहिमेसाठी घणसोली विभागातील अधिकारी / कर्मचारी, मजूर-12, ब्रेकर-3, जेसीबी-1, गॅसकटर-1 तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.
यापूढे देखील अशाप्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.