छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त युगनिर्माते प्रतिष्ठान, बांधिलकी प्रतिष्ठान, निर्धार सामाजिक संस्था, जय हिंद सेवा संस्था व खारघर युवा विचारमंच यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन
सध्या कोविड-१९ च्या प्रभावामुळे व भविष्यात लसीकरणानंतर राज्यात रक्ताचा तुटवडा पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच सध्याच्या परिस्थितीत कोविड रुग्णांसोबतच थॅलेसेमिया व इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना रक्ताची गरज खूप मोठ्या प्रमाणात भासत आहे. गरजू लोकांना रक्ताची कमी भासू नये व त्यांना सहजरित्या रक्त उपलब्ध व्हावे या अनुषंगाने छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त युगनिर्माते प्रतिष्ठान, बांधिलकी प्रतिष्ठान, निर्धार सामाजिक संस्था, जय हिंद सेवा संस्था व खारघर युवा विचारमंच यांच्या माध्यमातून दि. १६ मे, २०२१ रोजी कोपरखैरणे येथील न्यू बॉम्बे कल्चरल सेंटर, सेक्टर १५ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
सदर रक्तदान शिबिरात कोपरखैरणे, वाशी, घणसोली विभागातील अनेक रहिवाशांनी सामाजिक बांधिलकी जपत खूप मोठ्या संख्येने रक्तदान केले. यावेळी एकूण ६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे रक्तसंकलन माँ साहेब मीनाताई ठाकरे रक्तपेढी, न.मुं.म.पा यांच्या माध्यमातून करण्यात आले.
युगनिर्माते प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अक्षय चव्हाण, निर्धार सामाजिक संस्थेचे सचिव अनिल कुंभार, बांधिलकी प्रतिष्ठानचे उपसचिव स्वप्नील मुटके आणि खजिनदार विशाल कावरे, जय हिंद सेवा संस्थेचे सूरज गायकवाड, युगनिर्माते सदस्य गौरव शेजवळ व दिपक तुपे यांनी उत्तम रक्तदान शिबिराचे नियोजन केले होते.
यावेळी न.मुं.म.पा रक्तपेढी तर्फे सौ डॉ प्रियांका कटके, रक्तसंक्रमण अधिकारी व सरिता खेरवासिया, जनसंपर्क अधिकारी त्याचसोबत सुप्रसिद्ध शिवव्याख्याते गणेश बोर्गेजी, युगनिर्माते प्रतिष्ठान अध्यक्ष शंकर वसमाने, बांधिलकी प्रतिष्ठान अध्यक्ष पल्लवी निंबाळकर, निर्धार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश आहेर, खारघर युवा विचारमंचचे अर्जुन घाटगे, जय हिंद सेवा संस्थेचे अध्यक्ष राजकुमार सकपाळ, नवसंकल्प सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सागर जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.