चार दिवसात महानगरपालिका कोव्हीड केंद्रांसह सर्व खाजगी रुग्णालयांचे फायर, ऑक्सिजन, स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे निर्देश
नाशिक येथील ऑक्सिजन गळती दुर्घटनेनंतर लगेचच विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या अग्नि दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी तातडीने संबंधित अधिका-यांची बैठक घेत महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेच्या कोव्हीड केंद्रांसह सर्व खाजगी रुग्णालयांचे फायर, ऑक्सिजन व स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे निर्देश दिले.
या रुग्णालयांमध्ये फायर ऑडीट करण्याची जबाबदारी अग्निशमन विभागाचे प्रमुख श्री. शिरीष आरदवाड, ऑक्सिजन ऑडीट करण्याची जबाबदारी ऑक्सिजन नियंत्रण नोडल अधिकारी तथा उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे तसेच स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची जबाबदारी शहर अभियंता श्री. संजय देसाई यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे.
पुढील 4 दिवसात महानगरपालिकेच्या कोव्हीड केंद्रांसह सर्व खाजगी रुग्णालयांची तिन्ही ऑडीट पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
त्या त्या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ व्यक्तींकडून हे ऑडीट करून घेतले जाणार असून त्यामध्ये आवश्यकतेनुसार इंजिनियरींग कॉलेजमधील तज्ज्ञांचीही मदत घेतली जाणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोव्हीड सेंटर्स / रुग्णालयांप्रमाणेच खाजगी रुग्णालयांमध्येही ही तिन्ही प्रकारची ऑडीट केली जाणार असल्याने सर्व खाजगी रुग्णालयांच्या व्यवस्थापनांनी महानगरपालिकेमार्फत फायर, ऑक्सिजन व स्ट्रक्चरल ऑडीटसाठी रुग्णालयात येणा-या पथकांना संपूर्ण सहकार्य करावे असे सूचित करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोरोना बाधीतांना आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याप्रमाणेच त्यांच्या सुरक्षिततेकडेही काटेकोर लक्ष देण्यात येत आहे.