4 लक्ष कोव्हीड लस खरेदीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे ग्लोबल टेंडर
16 जानेवारी पासून कोव्हीड 19 लसीकरणाला डॉक्टर, नर्सेस अशा आरोग्यकर्मींपासून सुरुवात झालेली असून टप्प्याटप्प्याने पोलीस, सुरक्षाकर्मी असे पहिल्या फळीतील कोरोना योध्दे, ज्येष्ठ नागरिक, 45 वर्षावरील व्यक्ती व त्यानंतर 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणाला सुरुवात झालेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत 2 लाख 51 हजार 355 नागरिकांचे लसीकरण झालेले असून सध्या लसीचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने लसीकरणाच्या गतीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत.
या पार्श्वभूमीवर कोव्हीडची तिसरी लाट येण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यापूर्वी जास्तीत जास्त नवी मुंबईकर नागरिकांचे लसीकरण व्हावे याकरिता मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर कोव्हीड 19 लस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर प्रसिध्द करण्याचे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नियोजित केले आहे.
याकरिता ग्लोबल टेंडर प्रसिध्द करून लवकरात लवकर लस खरेदी करण्याची प्रक्रिया तत्परतेने करण्यात येत आहे.
नवी मुंबईची लोकसंख्या साधारणत: 15 लक्ष असून त्यामध्ये 18 वर्षावरील नागरिकांची अंदाजित 10 लक्ष 80 हजार इतकी लोकसंख्या विचारात घेता आत्तापर्यंत 2.51 लक्ष नागरिकांनी पहिला डोस घेतला असून त्यातील 58 हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. अशा रितीने साधारणत: 8 लक्ष 29 हजार नागरिकांचे प्रथम डोसचे लसीकरण प्रलंबित आहे. त्यामुळे शासनाकडून प्राप्त लसींचा पुरवठा लक्षात घेऊन लवकरात लवकर लसीकरण होण्याच्या दृष्टीने सदर लस खरेदी प्रक्रिया राबविली जात आहे.
1 मे 2021 च्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोव्हीड लस उत्पादकांमार्फत एकूण उत्पादन केलेल्या लसीचा 50 टक्के साठा केंद्र सरकारला दिला जात असून उर्वरित लस राज्य शासन, खाजगी संस्था व कंपन्यांना देण्यात येत आहे. त्यात नवी मुंबई महानगरपालिकेस प्राप्त लस पुरवठा लक्षात घेता नागरिकांच्या लसीकरणात होणारा विलंब या लस खरेदीमुळे टाळला जाईल.
अशा सर्व गोष्टींचा विचार करूनच महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सद्यस्थितीत 4 लक्ष लसीचे डोसेस खरेदी करण्याचे प्रस्तावित केले असून त्याकरिता ग्लोबल टेंडर प्रसिध्द करण्यात येत आहे.